Join us  

दो दिल मिल रहे है हे गाणे केवळ इतक्या मिनिटांत करण्यात आले होते रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:30 AM

परदेस या चित्रपटातील दो दिल मिल रहे है हे गाणे किती मिनिटांत रेकॉर्ड झाले होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

ठळक मुद्देमी दो दिल हे पूर्ण गाणे पाठ केले आणि सुभाष घईंच्या उपस्थितीत रेकॉर्डिंगसाठी गेलो. मी हे रेकॉर्डिंग फक्त 20 मिनिटांत पूर्ण केले. सुभाष घईंना हे गाणे इतके आवडले की, मी रेकॉर्डिंग रूममधून बाहेर येताच त्यांनी मला मिठी मारली.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय, दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात कुमार सानू हजेरी लावणार आहे.

 या कार्यक्रमात दोन आठवड्यांपूर्वी वाइल्ड कार्ड एंट्रीमध्ये प्रेरणाची निवड झाली. ती कुमार सानूंची खूप मोठी फॅन आहे. तिने परदेसच्या दो दिल मिल रहे है या गाण्यावर नृत्य सादर केले. तिचा परफॉर्मन्स कुमार सानूला प्रचंड आवडला आणि त्यामुळे त्यांना या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेसचा एक किस्सा आठवला आणि त्यांनी तो सगळ्यांसोबत शेअर केला. कुमार सानूने रेकॉर्डिंगविषयी सांगितले, परदेस या चित्रपटातील दो दिल मिल रहे है हे गाणे मी अवघ्या 20 मिनिटांत रेकॉर्ड केले होते. गाणे तयार करताना नदीम श्रवण चांगलेच टेन्शनमध्ये होते.

त्यांनी मला सांगितले की, सुभाष घईंसोबत माझे हे पहिलेच काम असल्याने मला या चित्रपटातील सगळीच गाणी खूपच चांगली बनवायची आहेत. कृपया त्यांना निराश करू नका. आमचे हे बोलणे झाल्यानंतर मी पूर्ण गाणे पाठ केले आणि सुभाष घईंच्या उपस्थितीत रेकॉर्डिंगसाठी गेलो. मी हे रेकॉर्डिंग फक्त 20 मिनिटांत पूर्ण केले. सुभाष घईंना हे गाणे इतके आवडले की, मी रेकॉर्डिंग रूममधून बाहेर येताच त्यांनी मला मिठी मारली.

सुपर डान्सर या कार्यक्रमात सगळेच जण खूप चांगला परफॉर्मन्स सादर करत आहेत. या कार्यक्रमात आता पहिले एलिमिनेशन होणार असून कोणता स्पर्धक आणि त्याचा गुरू प्रेक्षकांचा निरोप घेणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. 

सुपर डान्सर हा कार्यक्रम प्रेक्षकांना शनिवार आणि रविवारी रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळतो.

टॅग्स :कुमार सानूसुपर डान्सर