Join us  

मी काळी का आहे? मी जाडी का आहे? स्रेहल शिदमला प्रश्न छळायचे, पण ती खचली नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 8:00 AM

Chala Hawa Yeu Dya fame Snehal Shidam : प्रवास इतकाच नव्हता. या प्रवासात, रंगरूपावरून नाऊमेद करणारे टोमणे होते, खिल्ली उडवणारे लोक होते. पण स्रेहलने हा अपमान गिळला. पण जिद्द सोडली नाही.

ठळक मुद्दे‘ चला हवा येऊ द्या’ या शोमुळे  स्नेहलला अनेक मालिकेतून अभिनय साकारण्याची संधी मिळाली आहे. माझा होशील ना, भागो मोहन प्यारे यासारख्या मालिकेतून तिला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. 

चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल’ या पर्वाची विजेती कोण तर स्नेहल शिदम. फार कमी वेळात आता ‘ चला हवा येऊ द्या’चा  (Chala Hawa Yeu Dya) मंच आणि स्रेहल शिदम ( Snehal Shidam) हे समीकरण जुळलं. इतकं घट्ट की, आता  थुकरटवाडीत तिच्या नसण्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही. घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बारावीत असताना स्रेहलनं कॉलेजमधील रंगसंगती नावाचा नाटकाचा संघ जॉईन केला आणि पहिल्याच वर्षी तिला एकांकिकेत चांगली भूमिका मिळाला. इथून अभिनय करू शकतो, हा आत्मविश्वास तिनं कमावला आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर ती प्रायोगिक नाटकांकडे वळली. अर्थात हा प्रवास इतकाच नव्हता. या प्रवासात, रंगरूपावरून नाऊमेद करणारे टोमणे होते, खिल्ली उडवणारे लोक होते. पण स्रेहलने हा अपमान गिळला. पण जिद्द सोडली नाही. एका ताज्या मुलाखतीत ती यावर बोलली.

ती म्हणाली, ‘ मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. त्यामुळे काहीतरी काम करून नोकरी करून पैसे कमावणं हा माझा पहिला उद्देश होता. आज प्रसिद्धी आहे, लोकप्रियता आहे. पण त्याआधी मी खूप नकार पचवले. ऑडिशनला जायचे त्यावेळी मला रिजेक्ट केलं जायचं. मला फक्त मैत्रिणीच्या भूमिकेसाठीच बोलवलं जायचं आणि मग, त्यातही तू फिट बसत नाही, असं सांगून मला परत पाठवलं जायचं. आश्चर्य वाटेल पण मी आईच्या भुमिकेसाठीही ऑडिशन दिल्या. मात्र वयाकडे पाहून तेही काम मिळत नसे. त्यांच्या नजरेत मी कधीच कोणत्या भूमिकेत फिट बसणारी नव्हते. आधी मलाही कळायचं नाही. पण हळूहळू या नकारामागचं कारण मला कळू लागलं होतं.

अगदी जवळचे नातेवाईक देखील तू अजून काही करतेस की नाही, असेच टोमणे मारायचे. त्यावेळी मी का जाडी आहे?, मी का काळी आहे? असं वाटायचं. या गोष्टी कितीही इग्नोर करायच्या म्हटलं तरी प्रत्येकवेळी मला त्याची जाणीव करून दिली जायची. पण जिद्द कायम होती. अशात ‘चला हवा येऊ द्या’च्या ‘होऊ दे व्हायरल’ या पर्वासाठी मी ऑडिशन दिलं आणि एक एक टप्पा पार करत मी टॉप6 मध्ये आले. इतकंच नाही तर या पर्वाची विजेती ठरले. आज मी जे काही आहे ते फक्त ‘चला हवा येऊ द्या’मुळे आहे. या शोमुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. माझ्या मते, आपण कसं दिसतो ह्यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार कराल तरच आयुष्य किती सुंदर आहे हे कळेल...’

 ‘ चला हवा येऊ द्या’ या शोमुळे  स्नेहलला अनेक मालिकेतून अभिनय साकारण्याची संधी मिळाली आहे. माझा होशील ना, भागो मोहन प्यारे यासारख्या मालिकेतून तिला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या