Join us  

तेजस्वी प्रकाश सांगतेय प्रेमावर आहे तिचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 12:14 PM

वेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'कर्णसंगिनी' मालिकेत नायिका ऊरूवीची भूमिका साकारत आहे. प्रथमच पौराणिक मालिकेत ते काम करत आहेत.

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील स्टार प्लस वाहिनीवरील नवीन मालिका 'कर्णसंगिनी' ही कर्ण आणि त्याची पत्नी ऊरूवी यांच्यावर आधारीत आहे. महाभारतातील युद्ध आणि राजकरणाबद्दका सर्वांनाच ठाऊक आहे, पण या मालिकेत मात्र महाभारतातील दुर्दैवी नायक कर्ण, ऊरूवी आणि अर्जुन यांच्या कथेकडे अगदी नव्या दृष्टीकोनातून सादर केले जाणार आहे. वेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'कर्णसंगिनी' मालिकेत नायिका ऊरूवीची भूमिका साकारत आहे. प्रथमच पौराणिक प्रकारच्या मालिकेत ती काम करत असून तिला राजकन्येच्या रूपात पाहण्यासाठी तिचे फॅन्स चांगलेच उत्सुक होते. तिचा या मालिकेतील लूक नुकताच या मालिकेच्या प्रोमोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ती या लूकमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ही मालिका ऊरूवीच्या प्रवासाबद्दल आहे, जिने तिचा बालपणीचा सखा अर्जुनाच्या ऐवजी जीवनसाथी म्हणून कर्णाची निवड केली आणि ती त्याची राणी बनली. आपला प्रियकर कर्णासोबत राहण्यासाठी ऊरूवी समाज आणि अगदी सगळ्‌यांच्याच विरोधात गेली. त्यामुळे तिच्या विशुद्धता, धैर्य आणि प्रेमाबाबत तडजोड न करण्याच्या वृत्तीबद्दल ती मानली जाते. ही महत्त्वपूर्ण भूमिका तेजस्वी साकारत असून ही भूमिका आजवर तिने साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. या भूमिकेविषयी ती सांगते, ऊरूवीप्रमाणेच मीसुद्धा माझ्या प्रेमासाठी जगासोबत भांडू शकेन. माझा प्रेमात पडण्यावर आणि त्यामध्ये पूर्णपणे वाहून जाण्यावर विश्वास आहे. तो कुठल्या जातीचा, कोणत्या प्रांताचा आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. अन्य कुठल्याही गोष्टीपेक्षा प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि देवाच्या कृपेने माझे आईबाबा माझ्या निर्णयामध्ये मला पाठिंबा देतील असेच आहेत.

'कर्णसंगिनी' या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणावर केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, ही सुद्धा या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. आपल्या देखणेपणामुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता गौतम गुलाटी हा या मालिकेत महत्त्वाची भूमिका रंगवणार आहे.

टॅग्स :कर्णसंगिनी