Join us  

'तू बायल्या, फक्त साडी घालण्याच्या लायकीचा' म्हणणाऱ्यांची बोलती बंद करणारा 'कारभारी...' मधला 'गंगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 1:59 PM

'कारभारी लयभारी' मालिकेतील गंगाने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'तू बायल्या, फक्त साडी घालण्याच्या लायकीचा' अशा बऱ्याच कमेंट्स आणि टीकांना सामोरे जात अनेकांची बोलती बंद करत आज कारभारी लयभारी मालिकेतील गंगाने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की गंगा ट्रान्सजेंडर आहे. गंगाचे खरे नाव प्रणित हाटे असून ती अपार मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर इथंपर्यंत पोहचली आहे. गंगा या मालिकेतील राजवीर, प्रियंका, शोना यांच्या भूमिकेसोबत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.

झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन रिऍलिटी शोमधून होस्ट म्हणून गंगाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मराठीसृष्टीला मिळालेला पहिलावहिला ट्रान्सजेंडर चेहरा म्हणून आज गंगाला आपली वेगळी ओळख निर्माण करता आली आहे. मात्र इथपर्यंत पोहण्यासाठी गंगाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. 

प्रणित हाटे उर्फ गंगाचे मुंबईतील विद्या विहार परिसरात तिचे बालपण गेले. हाटे कुटुंबात पहिल्यांदा मुलगा जन्माला येऊनही तिची वर्तवणूक मात्र मुलींसारखीच असायची त्यामुळे तू बायल्या आहेस, छगन आहेस म्हणून मुले नेहमी चिडवायचे, मारायचे, पॅन्ट खाली ओढायचे . इतकेच नाही तर तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहेस म्हणून हिनवायचे या सर्व गोष्टींमुळे ती पुरती खचून गेल्याचे ती सांगते.

घरी कसं सांगायचे ?, त्यांना सांगितले तर घरचे मलाच ओरडतील मारतील या भीतीने मी त्यांच्याशी काहीच बोलत नसे. लहानपणी मी पहिल्यांदा हातावर मेहेंदी काढली होती तोच हात धरून भावाने माझ्या कानाखाली वाजवली होती. शाळेतही असताना मधल्या सुट्टीच्या वेळी टॉयलेटला गेल्यावर मुलं चिडवायचे, मारायचे यावेळीही मी खूप घाबरायचे परंतु एक दिवस माझा राग अनावर झाला आणि मी कुठलाही विचार न करता त्या मुलाच्या कानाखाली वाजवली. हे धाडस केल्यानंतर माझ्यातला आत्मविश्वास निर्माण झाला, असे गंगा सांगत होती. 

कालांतराने गंगाला तिच्या घरच्यांचाही पाठिंबा मिळाला. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे गंगा अभिनय, नृत्य आणि सूत्रसंचालन अशा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करताना दिसत आहे.

झी युवा डान्सिंग क्वीन मध्ये येण्यापूर्वी गंगाने वजुद आणि विग या चित्रपट आणि शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे.

टॅग्स :झी मराठीट्रान्सजेंडरझी युवा