Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेनच्या कमबॅकला लागणार इतका अवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 5:01 PM

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. 

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. चित्रीकरणाच्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम तिची खूप काळजी घेत असे. तसेच तिला त्रास होऊ नये यासाठी तिला काहीच तास चित्रीकरणासाठी बोलावले जात असे. या सगळ्यामुळेच तिला तिच्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधीपर्यंत चित्रीकरण करणे शक्य होत होते. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून दूर आहे. प्रेक्षकांची लाडकी दया मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

दिशाला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परतण्यासाठी अजून दोन महिने तरी लागणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे दिशाच्या फॅन्सना अजून काही दिवस तिची वाट पाहावी लागणार आहे. दिशाच्या कमबॅकविषयी या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी सांगतात, सध्या दिशासोबत आमचे तिच्या कमबॅकबाबत बोलणे सुरू आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर पुढील दोन महिन्यात ती मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करेल. 

दिशाने खिचडी या मालिकेत तर देवदास, जोधा अकबर यांसारख्या मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण तिला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. या मालिकेतील तिची बोलण्याची ढब, गरबा खेळण्याची स्टाइल या गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी