Join us  

"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 4:27 PM

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) हिला मतदार यादीत नाव नसल्यामुळे तिला मतदानाचे कर्तव्य बजावता आला नाही. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे.

आज देशात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानात गायिका सावनी रवींद्र आणि अभिनेता सुयश टिळकचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सारं काही तिच्यासाठी मालिकेत मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) हिलादेखील आज मुंबईत मतदान करता आले नाही. मतदार यादीत तिचे नाव नसल्यामुळे तिला मतदानाचे कर्तव्य बजावता आला नाही. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे. 

वैशाली भोसले हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तुमचे मत तुमचा आवाज आहे, अवश्य मतदान करा.. अभिमान बाळगा..  लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा भाग व्हा.. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे.. भारतीय नागरीक म्हणून मतदान करणं माझं आद्य कर्तव्य आहे.. आपलं एक मत सुद्धा अत्यंत मोलाचं असतं याची मला जाणीव आहे..आणि म्हणूनच अनेक वर्ष मी ते आवडीने करतेय.. अभिनेत्री म्हणून अशा जाहिराती सुद्धा केल्यात..

तिने पुढे म्हटले की, मतदान करायचं म्हणून आमच्या मालिकेच्या शूटिंग च्या वेळाही आम्हाला तशा मॅनेज करून दिल्यात..नित्यनियमाप्रमाणे माझे पप्पा मतदानाच्या दिवसाआधीच मतदार यादी बूथ क्रमांक मतदार क्रमांक असं सगळं शोधून ठेवतात.. पण गेल्या काही दिवसांपासून यादीत माझं नाव दिसत नाहीये.. म्हटलं बूथ वर जाऊन शोधू. पण आज सकाळी साडे सात वाजल्यापासून ते साडे दहा पर्यंत सगळ्या संबंधित याद्या पालथ्या घातल्या..

याला जबाबदार कोण…? प्रशासन की..?

माझी आजी जाऊन पंधरा वर्ष झाली तिचं नाव आहे, सासूबाई जाऊन सहा वर्ष झाली ..सासरेबुवा जाऊन तीन वर्ष झाली.. मी आहे जिवंत माझं नाव नाही.. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.. मला वाईट वाटतंय… पाच वर्षातून एकदा येणारी ही संधी त्याचा मला लाभ घेता आला नाही.. लोकशाहीच्या या उत्सवात मला सहभागी होत आलं नाही.. याला जबाबदार कोण…? प्रशासन की..?, असा सवाल करत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४