Join us  

‘इंडियन आयडल 12’नंतरही काहीचं बदललं नाही...! सवाई भट्टची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 12:46 PM

‘इंडियन आयडल 12’नंतर टॉप 6 स्पर्धकांचं नशीब चांगलंच फळफळलंय.पण सर्वांच्याच वाट्याला हे येतं असं नाही. सवाई भट्ट हा त्यापैकीच एक.

‘इंडियन आयडल’ हा टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय शो. या शोनं अनेकांचं आयुष्य बदललं. गाण्याच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी हा शो देतो आणि त्यातून अनेक प्रतिभावंतांचं आयुष्य बदलतं. नुकताच ‘इंडियन आयडल’चा 12 वा (Indian Idol 12)  सीझन नुकताच पार पडला. पवनदीप राजन हा या शोचा विजेता ठरला होता. तर अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली होती. दोघांचीही गाडी सूसाट पळतेय. पवनदीप व अरूणिता यांच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. या दोघांसोबत सायली कांबळे, दानिश मोहम्मद सध्या युकेमध्ये लाईव्ह शो करत आहेत. लवकरच या चौघांना निहार तारो आणि शन्मुख प्रिया ज्वॉईन करणार आहेत. एकंदर काय तर ‘इंडियन आयडल 12’नंतर या टॉप 6 स्पर्धकांचं नशीब चांगलंच फळफळलंय. पण सर्वांच्याच वाट्याला हे येत नाही. सवाई भट्ट  (Savai Bhatt) हा त्यापैकीच एक.

होय, राजस्थानातील सवाई भट्ट हा सुद्धा ‘इंडियन आयडल 12’चा भाग होता. या शोमुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. पण शोनंतर काय तर, तर तो पुन्हा पूर्वपदाला आला आहे.

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘इंडियन आयडल 12’ संपल्यानंतर सवाई पुन्हा गरिबीत आयुष्य जगतोय.  राजस्थानमधील एका छोट्याशा गावातून आलेला सवाई हा शो मध्ये येण्यापूर्वी गावागावात जाऊन कळसूत्री बाहुल्याचा खेळ दाखवून पोट भरत होता. अशात सवाई ‘इंडियन आयडल 12’मध्ये स्पर्धक बनून आला. आॅडिशन राऊंडमध्येच त्यानं अशी काही कमाल केली की, सगळे त्याचे आणि त्याच्या आवाजाचे फॅन झाले होते. स्टेजवरही त्यानं कमाल केली. त्याच्या खणखणीत आवाजानं असंख्य लोक त्याचे चाहते झालेत. अगदी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली ही सुद्धा त्याची फॅन झाली. ‘इंडियन आयडल 12’नं सवाईला प्रचंड लोकप्रियता दिली. शो संपल्यानंतर हिमेश रेशमिया यांनी त्याचे अनेक म्युझिक व्हिडीओही काढले होते. त्यालाही लोकांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण तेवढ्यापुरताच. यानंतर सध्या सवाई काय करतो, तर तो पुन्हा आपल्या जुन्या आयुष्यात परतला आहे. गरिबीनं पाठ सोडलेली नाही. घर घेण्याचं स्वप्नं होतं. पण ते सुद्धा अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यानं  राजस्थान सरकारकडे मदत मागितली होती. मात्र त्याला आद्यपही कोणतीच मदत मिळाली नाही. 

टॅग्स :इंडियन आयडॉल