‘साथ निभाना साथियाँ’च्या सेटवर इफ्तार पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 11:16 IST
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा किंवा मग रंगभूमी... समाजात घडणा-या चांगल्या वाईट घटनांचं प्रतिबिंब या तिन्ही माध्यमांमध्ये पाहायला ...
‘साथ निभाना साथियाँ’च्या सेटवर इफ्तार पार्टी
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा किंवा मग रंगभूमी... समाजात घडणा-या चांगल्या वाईट घटनांचं प्रतिबिंब या तिन्ही माध्यमांमध्ये पाहायला मिळतं.यासोबतच विविध सणांचं सेलिब्रेशनही कोणत्या ना कोणत्या प्रसंगात तिन्ही माध्यमांत पाहायला मिळतंच. छोट्या पडद्यावर तर विविध भारतीय सणांचं सेलिब्रेशन मोठ्या दणक्यात केलं जातं. गणपती असो किंवा दिवाळी, ख्रिसमस असो किंवा ईद. प्रत्येक सण छोट्या पडद्यावरील मालिका आणि विविध शोमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. रमजानच्या या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास पाळतात. रोजा सोडताना मुस्लिम बांधवांमध्ये इफ्तारीची प्रथा असते. इफ्तारीच्या माध्यमातून रोजे सोडले जातात. ठिकठिकाणी यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत असतं. याच पार्श्वभूमीवर साथ निभाना साथियाँ या छोट्या पडद्यावरील मालिकेच्या सेटवरही इफ्तारीचं आयोजन करण्यात आलं होतं. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणारे कलाकार, पडद्यामागचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यापासून ते स्पॉटबाईज यांच्यातले अनेकजण रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे पाळत असतील. त्या सगळ्यांसाठी साथ निभाना साथियाँ या मालिकेच्या सेटवरसुद्धा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिनं सोशल मीडियावर या इफ्तार पार्टीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. संपूर्ण युनिटसह इफ्तारचा आनंद घेतल्याचं ट्विट तिनं केलं आहे. शिवाय तिनं सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. साथ निभाना साथियाँ या मालिकेच्या सेटवरील या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडलं आहे.