‘गॅरी’ आणि त्याच्या रिअल लाईफ ‘राधिका’ची फेसबुकवरुन सुरु झाली होती लव्हस्टोरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 15:42 IST
छोट्या पडद्यावरील माझ्या नव-याची बायको या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. गुरुनाथ, राधिका आणि शनायाची जुगलबंदी ...
‘गॅरी’ आणि त्याच्या रिअल लाईफ ‘राधिका’ची फेसबुकवरुन सुरु झाली होती लव्हस्टोरी !
छोट्या पडद्यावरील माझ्या नव-याची बायको या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. गुरुनाथ, राधिका आणि शनायाची जुगलबंदी असलेली ही मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा विशेष आणि खास आहे. मग ती गुरुनाथ म्हणजेच गॅरी असो किंवा त्याच्या पैशावर लट्टू झालेली शनाया असो, किंवा मग या दोघांना धडा शिकवणारी गुरुनाथ सुभेदारची बायको राधिका असो. प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या मालिकेत गॅरी म्हणजेच गुरुनाथ ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर याने साकारली आहे. माझ्या नव-याची बायको या मालिकेत गुरुनाथचे त्याची पत्नी राधिकासोबत पटत नसलं तरी रिअल लाइफमध्ये गुरुनाथचं त्याच्या पत्नीवर विशेष प्रेम आहे. गुरुनाथ म्हणजेच अभिजीतचं अभिनेत्री सुखदा देशपांडे हिच्याशी दीड वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. अभिजीत आणि सुखदा यांचं लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. दोघांची लव्ह स्टोरीही स्पेशल आहे. सोशल मीडियावरुन दोघांची एकमेकांशी ओळख झाली. फेसबुकच्या माध्यमातून दोघं पहिल्यांदा भेटले. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही मूळचे नाशिकचे. अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमुळे अभिजीत रसिकांचा लाडका बनला होता. ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. नाशिकचा मुलगा मालिकेत एवढं चांगलं काम करतो आहेस, हे कौतुकास्पद आहे अशा शब्दांत सुखदाने फेसबुकवर अभिजीतवर स्तुतीसुमनं उधळली होती. यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. यानंतर एकमेकांचा विचार करायला हरकत नाही अशा शब्दांत अभिजीतनंच सुखदाला प्रपोज केलं. सुखदाने हे अभिजीतचे हे प्रपोज स्वीकारलं आणि 1 फेब्रुवारी 2013 रोजी दोघंही रेशीमगाठीत अडकले. नाशिकमध्ये अभिजीत आणि सुखदाचं शुभमंगल मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे.