Join us  

अखेर विशाखा सुभेदारनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण आलं समोर, दिग्दर्शकांनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 12:29 PM

Vishakha Subhedar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाने शो का सोडला याचा खुलासा केला.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहेत. यातील विनोदवीरांनी आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या शोमुळे या कलाकारांच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झाली आहे. या विनोदवीरांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. मधल्या काळात काही कलाकार शो सोडून गेल्यामुळे प्रेक्षक दुखावले होते. यात ओंकार भोजने (Onkar Bhojane) आणि विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांचा समावेश आहे. दरम्यान आता शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) आणि सचिन मोटे (Sachin Mote) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाने शो का सोडला याचा खुलासा केला.

दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी नुकतीच नुकतीच भार्गवी चिरमुलेला मुलाखत दिली. यावेळी सचिन मोटेंनी सांगितले की, विशाखा सोडून गेली त्यावेळी आमची बरीच चर्चा झाली होती. ती म्हणाली होती की, गेली १० ते १२ वर्ष मी हेच करतेय. ‘फू बाई फू’च्या पहिल्या पर्वाची ती विजेती होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ती स्किट करत होती. तसेच तिने बरेच कॉमेडी शो केलेत, त्यामुळे आता या जॉनरपासून तिला ब्रेक हवा होता. शो सोडून गेलेले सगळे सांगून बाहेर पडले, कोणीही वादामुळे किंवा आमच्याशी खटके उडाल्यामुळे सोडून गेलेलं नाही. ते पुढे म्हणाले की, या क्षेत्रात येणारा प्रत्येक जण हा कलाकार आहे. त्याला आयुष्यभर एकच गोष्ट करायची असती तर त्याने नोकरी केली असती ना.

थोडा काळ लोक दुखावतील पण...

तर सचिन गोस्वामी यांनी सांगितले की, जुन्यांना यापेक्षा मोठी संधी मिळाली की ते पुढे जातात, त्यांच्याजागी इतरांना संधी मिळते, त्यामुळे जुन्यांनी जाणंही आवश्यक असते. विशाखासोबत आमचं बोलणं होतं, ती मेसेज करत असते. विशाखाला हे माहीत असते की ती गेल्यामुळे शो बंद होणार आहे, तर ती नक्कीच गेली नसती. कारण या कार्यक्रमात तिचा जीव आहे. ज्या टीमबरोबर आपण इतका छान काळ घालवला, त्यांचे नुकसान व्हावे असे कुणाला वाटत नाही. त्यांना माहीत असते की आपली जागा कुणीतरी घेईल, थोडा काळ लोक दुखावतील पण शो सुरू राहील. नदी वाहते म्हणून पाणी स्वच्छ आहे, रुचकर आहे, नाही तर त्याचंही डबके झाले असते.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा