Join us  

'फन्ने खान' येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 8:40 PM

अतुल मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फन्ने खान' या चित्रपटात अनिल कपूर, ऐश्वर्या राय, राजकुमार राव, दिव्या दत्ता आणि पिहू संद हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

ठळक मुद्देफन्ने खान चित्रपटाची कथा वडील आणि त्यांच्या स्थूल मुलीच्या आयुष्याभोवती आधारीत

दैनंदिन आयुष्यातील निरर्थक शर्यतीतून बाहेर पडून जग जिंकायला निघालेल्या वडील-मुलीच्या या जोडीने सगळ्या आव्हानांना परतवून आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी झोकून दिले आहे. ही तुमच्या आमच्या आयुष्याची कथा सांगणाऱ्या 'फन्ने खान' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १८ जानेवारीला रात्री ९ वाजता सोनी मॅक्सवर पाहायला मिळणार आहे.

अतुल मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फन्ने खान' या चित्रपटात अनिल कपूर, ऐश्वर्या राय, राजकुमार राव, दिव्या दत्ता आणि पिहू संद हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या व्यक्तिरेखांनी आयुष्यभर बाळगलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चाळ आणि गगनचुंबी इमारतींच्या परस्परविरोधी जगांचा एकमेकांशी झालेला सामना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

फन्ने खान चित्रपटाची कथा फिरते ती वडील आणि त्यांच्या स्थूल मुलीच्या आयुष्याभोवती. प्रशांत कुमार हा १९९०च्या दशकातील ऑर्केस्ट्रा गायक फन्ने खान (अनिल कपूर) या नावाने ओळखला जातो. तो मोहम्मद रफींचा चाहता आहे. अर्थात, तो कधीही संगीतविश्वात काही करू शकत नाही. त्याला मुलगी होते तेव्हा तो तिचे नाव लता मंगेशकरांवरून लता असे ठेवतो आणि तिला मोठी गायिका करायचे असे मनाशी ठरवतो. अनेक वर्षांनंतर लता गायिका होण्याचा प्रयत्न करते पण तिचे वजन तिच्या आड येते. प्रशांत सध्या एका छोट्या कारखान्यात काम करत असतो. तो कारखाना बंद पडतो. प्रशांतला वाटते की,त्याचे लताला गायिका बनवण्याचे स्वप्न आता मोडणार. लवकरच, तो गुपचूप ड्रायव्हिंग सुरू करतो. बेबी सिंग नावाची प्रसिद्ध गायिका जेव्हा त्याच्या टॅक्सीत बसते, तेव्हा तो तिचे अपहरण करतो आणि तिला त्याच्या कारखान्यात घेऊन जातो. तिथे त्याचा मित्र अदिर त्याला मदत करतो. ते दोघेही बेबीचा मॅनेजर करण कक्कडला फोन करतात आणि खंडणी मागतात. लवकरच कथा उलगडते आणि त्यांची आयुष्ये वेगळ्याच वळणाला लागतात. 

टॅग्स :फन्ने खांअनिल कपूर