Join us  

कुंकू, टिकली आणि टॅटू मागचे स्त्रीचे अस्तित्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 7:19 AM

कुंकू, टिकली आणि टॅटू ही चिन्हं स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत... मात्र आज स्त्री - पुरुष ही भेदरेषा पुसट झालीय. ...

कुंकू, टिकली आणि टॅटू ही चिन्हं स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत... मात्र आज स्त्री - पुरुष ही भेदरेषा पुसट झालीय. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सगळ्याच क्षेत्रात भरारी घेतायत. मग या चिन्हांमधूनच व्यक्त व्हायची आज खरंच गरज आहे का? आजच्या काळात या प्रतिकांचा नेमका अर्थ काय? ही प्रतिकं काय सांगू पाहतायत? कलर्स मराठी वाहिनीवर "कुंकू, टिकली आणि टॅटू" नावाची मालिका सुरु झालीय, त्यानिमित्ताने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांचं कुंकू, टिकली, टॅटू या प्रतिकांबाबत काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.... अंजली  भागवत  आंतरराष्ट्रीय नेमबाज - माझा खेळ खरंतर पुरुषप्रधान आहे. पण माझ्या आईने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मी या खेळाकडे वळले. माझी आई ही  कुंकू याच संस्कारातली आहे. तिचे उत्तम संस्कार माझ्यावर आहेत.  तिची स्वप्नं तिने माझ्यात पाहिली आणि जे तिला करता नाही आलं ते करण्यासाठी तिने मला आकाश खुलं करून दिलं. त्यामुळे मी घर सांभाळून माझ्या कलेत प्राविण्य मिळवू शकले. कुंकू, टिकली किंवा टॅटू हे बाह्य आवरण आहे. तुमचे विचार सगळ्यात महत्वाचे असे मला वाटते. कुंकू लावणाऱ्या आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले किंवा रमाबाई रानडे यांचे विचार काळाच्या खूप पुढचे होते.... प्रगल्भ होते. आज ज्या संधी मुलींना उपलब्ध आहेत, त्या तेव्हाच्या स्त्रियांना नव्हत्या… तरी त्या काळातल्या स्त्रियांनी आपलं एक भक्कम स्थान बनवलं होतं. त्या महिलांनी आपल्या कुटुंबाला धरून ठेवलं, त्यांना शिक्षण दिलं... नवे विचार दिले, नवे संस्कार रुजवले. आज आपण या जगात आत्मविश्वासाने वावरू शकतो त्याचं श्रेय त्यांनाच आहे. तुम्ही कुंकू, टिकली, टॅटू काहीही लावा पण तुमच्या आतला आवाज तुम्ही कसा ऐकता आणि आपल्या समाजासाठी काय करता, हे मला अधिक महत्वाचं वाटतं.   अलका आठल्ये , अभिनेत्री -   स्त्रीकडे बघण्याचा स्त्रीचाच दृष्टिकोन अजून बदललेला नाही. मी माझ्या मुलींना खूप स्वातंत्र्य दिलं. माझ्यावर जे संस्कार झाले त्यामुळे मी कपाळावर कुंकू किंवा टिकली लावून साडी परिधान करून लोकांसमोर जाते. कारण पडद्यावर आणि लोकांमध्ये माझी तशी इमेज आहे. पण खऱ्या आयुष्यात मी खूप वेगळी आहे.. बिनधास्त आहे.  पण मला यात सांधा जुळवावासा वाटतो... हा बॅलन्स सांभाळायला मला माझ्या सासूबाईंची खूप मोलाची मदत झाली. स्त्रीला कुंकवाशिवाय शोभा नाही. कुंकू हा एक संस्कार आहे ... कुंकू म्हणजे सात्विकता... मी घरातून बाहेर पडताना कधीही कुंकू लावल्याशिवाय बाहेर पडत नाही, कारण मला तो देवीचा आशीर्वाद वाटतो. ईशानी आठल्ये , वैमानिक -  : माझी आई अभिनेत्री अलका आठल्ये व बाबा छायाचित्रकार समीर आठल्ये यांनी सुदैवाने आम्हा दोन्ही मुलींना कधी मुलींसारखं वागा, असे सल्ले नाही दिले. आमच्यावर संस्कार असे झाले कि जुन्याचा आदर ठेवा नि उंच भरारी घ्या. म्हणूनच मी पायलट होऊ शकले. पण आज हे क्षेत्र निवडल्यावर अनेकजण प्रश्न विचारतात कि, तू घर कसं सांभाळणार? स्वयंपाक येतो का? मला कळत नाही हे प्रश्न मुलींनाच का विचारले जातात? आणि विचारणाऱ्याही बायकाच असतात, याचंही मला नवल वाटतं.  मुलींना का बंधनं?  तिच्या घरी येण्याच्या वेळा, पोशाख यांवर सतत निर्बंध घातले जातात. तिला जे सोयीचं वाटतं, तिला जे आवडतं ते तिला परिधान करू द्या... तिला आवडलेलं क्षेत्र निवडण्यासाठी तिला पाठबळ द्या ना…. मला हवं तसंच मी जगेन, मला काम असेल तेव्हा मी घरातून बाहेर पडेन किंवा घरी येईन ... मला जे आवडेल ते मी परिधान करेन.  शेवटी मी काय काम करते, ते मला सर्वात महत्वाचं वाटतं.अरुणा ढेरे,ज्येष्ठ साहित्यिक - कुंकू म्हणजे परंपरेतली क्षमाशील, सहनशील अशी सत्वशीलता!  टिकली म्हणजे स्वातंत्र्याची इच्छा करणारी  आणि त्या दृष्टीने पुढे पाऊले टाकणारी आत्मविश्वासपूर्ण अशी स्निग्धता !! तर उन्मुक्त, मर्यादा सहज ओलांडणारी, साहसी आणि स्वच्छंदी अशी ती टॅटू!!! भारतीय स्त्री जीवनाचा विचार केला तर अगदी अलीकडे पर्यंत तो सोशिकतेचा म्हणजे सीतेचाच चेहरा होता, तो द्रौपदीचा चेहरा फार कमी होता. पण आता काळ झपाट्याने बदलतोय.  स्त्रीजीवनातील मोठी विसंगती म्हणूयात कि, ज्यात आपल्याला तीन पातळ्यांवरच्या स्त्रिया दिसतात. अजूनही परंपरेतलं सत्व घेऊन जगणारी स्त्री आपल्या भोवती नांदताना दिसते. खरंतर गेल्या ढीतल्या स्त्रिया बऱ्याचशा अशाच होत्या. ज्यांनी आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांचं आयुष्य आपल्या डोक्यावर झेललं आणि वाट काढली. प्रसंगी खंबीरपणे उभ्या राहिल्या... झुंजल्या... सगळ्या आव्हानांना तोंड देत पलीकडे गेल्या... त्यांनी कुठली स्त्रीमुक्तीची भाषा नाही केली पण वेळ पडेल तेव्हा त्यांच्यातल्या त्या त्या शक्ती जाग्या झाल्या. आणि स्वातंत्र्याच्या काळापासून सगळीकडे त्यांनी आपल्या क्षमतांचं दर्शन घडवलं. या सगळ्या कुंकू परंपरेतल्या स्त्रिया मागच्या पिढीपर्यंत होत्या. यानंतर मधल्या काळातल्या स्त्रिया... ज्या प्रगतीच्या वाटेवरच्या स्त्रिया... यांना स्वतःची वाट घराबाहेर पडून चोखाळायची आहे. स्वतःच्या क्षमतांची पुरेपूर जाणीव आहे, आपली आवड, आपल्या इच्छा त्या जपू पाहतायत. घर संसाराबरोबरच त्या आपल्याला हवं असलेलं मिळवू पाहतायत, काही नवं घडवू पाहतायत आणि सार्वजनिक जीवनात आपला अर्थपूर्ण सहभाग नोंदवू इच्छितात. यानंतरची नव्या पिढीतली आजची स्त्री.  हिने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. जिची बुद्धिमत्ता विलक्षण आहे, नव्या जगाचं वारं ती प्यायली आहे... कुठल्याही आव्हानांना सामोरं जाण्याचं धाडस तिच्यात आहे.  त्यामुळेच एक प्रकारची मुक्तता तिच्यात आहे. मला हवं तिथे झेपावत जाईन, हा आत्मविश्वास तिच्यात आहे. एका बाजूला परंपरावादी स्त्री… जी परंपरेची सगळी सत्वशीलता बरोबर घेऊन पुढे चालली... तिची परंपरा हळूहळू कर्मकांडात बदलत गेली आणि त्या कर्मकांडालाच आपलं जगणं मानून त्या रिंगणात ती अडकत गेली… दुसरीकडे प्रगतीच्या वाटेवर चालू इच्छिणारी तरी मागच्या पिढीशी आपलं नातं जपून मर्यादा ओलांडताना तिचा स्वतःचा संयम सांभाळणारी.... तर कधी मी माझ्या नशिबाची म्हणत आपली वाट काढत पुढे जाणारी लोकपरंपरेतील स्त्री... भारतीय परंपरेतल्या या सगळ्याच स्त्रिया मला खूप महत्वाच्या वाटतात. आज अनेक वेगवेगळी आव्हानं या सगळ्याच स्त्रियांपुढे आहेत. आपल्या परंपरेत स्त्रीला सासरी जाताना स्त्रीधन दिलं जायचं. आज हे स्त्रीधन प्रतीकात्मक आहे... ते विचारांचं, अनुभवांचं धन आहे, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलं गेलं पाहिजे म्हणजे दोन पिढ्यातील अंतर कमी होईल, संवाद चांगला होईल आणि कुटुंबव्यवस्था टिकून राह्यला हे स्त्रीधन कामी येईल, असं मला वाटतं!!