Join us  

Exclusive! ​जितेंद्र जोशी, फुलवा खामकर, शकुंतला नगरकर बनणार ढोलकीच्या तालावरचे परीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2017 10:18 AM

ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन सिझन्सना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पर्वांना मिळालेल्या यशानंतर या कार्यक्रमाचे ...

ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या पहिल्या दोन सिझन्सना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पर्वांना मिळालेल्या यशानंतर या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिल्या दोन भागात प्रेक्षकांना मोठ्यांचे नृत्य पाहायला मिळाले होते. पण यंदाचा सिझन हा स्पेशल असणार आहे. या कार्यक्रमात लहान मुले त्यांची नृत्यकला सादर करताना आपल्याला दिसणार आहेत. छोट्यांची अदाकारी... लई भारी अशीच या कार्यक्रमाची यंदाची टॅगलाइन आहे.ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसोबतच या कार्यक्रमाच्या परीक्षकांची नेहमीच चर्चा असते. आतापर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमात आपल्याला परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळाले आहेत. या सिझनमध्येदेखील अनेक दिग्गज परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत. हे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात सरस आहेत. जितेंद्र जोशी, फुलवा खामकर आणि शकुंतला नगरकर या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. जितेंद्र आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयातून ही गोष्ट सिद्ध केली आहे तर फुलवा खामकर ही स्वतः एक खूप चांगली नर्तिका असून आज मराठीतील सगळ्यात प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. शकुंतला नगरकर हे लावणी क्षेत्रातले खूप मोठे नाव आहे. या कार्यक्रमाच्या परीक्षणासाठी ते सध्या खूपच उत्सुक आहेत. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून एकापेक्षा एक सरस नृत्य प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी हेमंत ढोमेची निवड करण्यात आली आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची हेमंतची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हेमंत सध्या यावर प्रचंड मेहनत घेत आहे.