Join us  

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत येणार भावनिक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 3:04 PM

भाकरीने माझी भूक भागणार नाही तर तू शिकलास तर माझी भूक भागेल असे सांगणारे रामजी बाबा विचारांनी किती प्रगल्भ होते याचा अंदाज येतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात त्यांच्या वडिलांचा म्हणजेच रामजी बाबांचा मोठा हात होता. त्याच रामजी बाबांचं वर्णन आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या ओळी. प्रसंगी पोटाला चिमटे काढून, काटकसर करुन रामजी बाबांनी भीवाला शिकवलं, चांगली व्यक्ती म्हणून घडवलं. त्याच रामजी बाबांचं देहावसान होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या आयुष्यातलं हे अत्यंत भावनिक वळण आहे. बये म्हणजेच आईला गमावल्यानंतर रामजी बाबांनी भीवाला प्रेमाने वाढवलं. त्याच्यावर संस्कार केले. आई आणि वडिलांचीही माया दिली. भाकरीने माझी भूक भागणार नाही तर तू शिकलास तर माझी भूक भागेल असे सांगणारे रामजी बाबा विचारांनी किती प्रगल्भ होते याचा अंदाज येतो.

भीवावर जीवापाड प्रेम करणारे रामजी बाबा अंतिम श्वासापर्यंत भीवाच्या प्रगतीसाठी आणि न्यायहक्कांसाठी लढले. दीन-दलितांचा त्राता हो ही शिकवण रामजी बाबांनी भीवाच्या मनात पेरली. आयुष्यभर सावलीसारखा पाठीशी उभ्या राहिलेल्या बापाचं आपल्यातून निघून जाणं हा धक्का भीवाला न पचणारा आहे. वडिलांसाठी आणलेली आवडीची मिठाई देऊ शकलो नाही ही खंत भीवाला कायम सलत राहिली.

रामजी बाबांची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद अधिकारी यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला. रामजी बाबांच्या या अखेरच्या प्रवासासोबतच मिलिंद यांचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतला प्रवास संपतोय. मालिकेच्या या आठवणींबद्दल सांगताना ते म्हणाले, मालिका लोकप्रिय होतेय, गोष्ट पुढे सरकते आहे. मालिकेतली माझी भूमिकाही संपते आहे. हे सगळंच थोडं भावूक आहेच पण कथानक, मालिका पुढे सरकण्यासाठी अपरिहार्यही आहे. माझ्या भूमिकेवर तुम्ही मनापासून प्रेम केलंत. लहानथोर प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारं अमाप प्रेम हे सगळं थक्क करणारं होतं, जबादारीची जाणीव करून देणारं होतं. आभार मानण्यापलिकडे काहीच करू शकत नाही. आजन्म ऋणी आहे रामजीबाबा, बाबासाहेब आणि रमाईचा. अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्टार प्रवाह