Join us  

या अभिनेत्रीने लावला बहिणीच्या सासूवर आरोप, विम्याची रक्कम मिळण्यासाठी केली नवऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 1:20 PM

या अभिनेत्रीने फेसबुकला लिहिलेल्या एका पोस्टमुळे सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या फेसबुक पोस्टद्वारे तिने तिच्या बहिणीच्या सासूवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी माझ्या आईला काही पुरावे मिळाले होते की, माझ्या बहिणीच्या सासूने नवऱ्याला मारून त्यांचे विम्याचे पैसे हडपले. त्यामुळे माझ्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पण त्यानंतर ती बाई मला आणि माझ्या आईला सतत मारण्याचा प्रयत्न करत आहे.

दिल मिल गये ही मालिका एकेकाळी चांगलीच गाजली होती. या मालिकेची कथा, या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या होत्या. या मालिकेमुळे करण सिंग ग्रोव्हरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील नायिका शिल्पा आनंद प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेनंतर शिल्पा छोट्या पडद्यापासून दूर गेली. ती कोणत्या पार्टी, समारंभात देखील अनेक वर्षांपासून दिसत नव्हती. पण अनेक वर्षांनी ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

शिल्पाने फेसबुकला लिहिलेल्या एका पोस्टमुळे सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या फेसबुक पोस्टद्वारे शिल्पाने तिच्या बहिणीच्या सासूवर गंभीर आरोप केले आहेत. तिची बहीण ही प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी शिवानंद असून तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. चिरंजीवी, नागर्जुन अशा आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ती चित्रपटांमध्ये झळकली आहे. 

शिल्पा आनंदने २०१५ मध्ये फेसबुकवरील शिल्पा आनंद हे नाव बदलून ओहाना आनंद असे केले होते. याच अकाऊंटवरून शिल्पाने पोस्ट केली आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या खाजगी आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या. याचे कारण केवळ माझ्या बहिणीची म्हणजेच साक्षीची सासू आहे. त्यांच्यामुळे मला अनेकवेळा पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागत आहेत. काही दिवसांपूर्वी माझ्या आईला काही पुरावे मिळाले होते की, माझ्या बहिणीच्या सासूने नवऱ्याला मारून त्यांचे विम्याचे पैसे हडपले. त्यामुळे माझ्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पण त्यानंतर ती बाई मला आणि माझ्या आईला सतत मारण्याचा प्रयत्न करत आहे. 

पोस्टमध्ये तिने पुढे असे देखील लिहिले आहे की, काही महिन्यांपूर्वी माझी बहीण साक्षी भारतात आली होती, त्यावेळी तिच्या सासूने तिला देखील मारण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलिसांना याबाबतची कल्पना दिल्यानंतर त्या अमेरिकेला पळून गेल्या. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवायचा आहे की, तुमच्यात हिंमत असेल तर भारतात परत या आणि न्यायालयीन लढाईला सामोरे जा... त्या भारताच्या बाहेर पळून जाणार असल्याची आम्ही पोलिसांना कल्पना दिली होती. पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. 

 

टॅग्स :करण सिंग ग्रोव्हर