Join us  

दिल दोस्ती दुनियादारी बनली आता दिल दोस्ती दोबारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 5:59 AM

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या यशानंतर दिल दोस्ती दोबारा हा या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अमेय वाघ, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

दिल दोस्ती दुनियादारी या कार्यक्रमाने तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना वेड लावले होते. या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या होत्या. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कोणतेही प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळाले नव्हते. अमेय वाघ, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर यांसारखे अनेक नवोदित कलाकार या मालिकेत झळकले होते आणि या सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांची लाडकी असली तरी या कार्यक्रमाने खूपच कमी भागात प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. एकाच घरात राहाणाऱ्या काही मित्रमैत्रिणींची कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळाली होती. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन येणार असल्याची झी मराठी वाहिनीने घोषणा केली होती. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची लोक आतुरतेने वाट पाहात होते. आता हा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या दुसऱ्या सिझनचे नाव दिल दोस्ती दोबारा असे असणार आहे. दिल दोस्ती दोबारा या मालिकेची कथा एका रेस्टॉरंटमधील असून या रेस्टॉरंटचे नाव खयाली पुलाव रेस्टॉरंट असे आहे. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये आशू, सुजय, कैवल्य, मीनल, रेश्मा आणि अॅना या व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आता साहिल, गौरव, पप्या, मुक्ता, आनंदी आणि परी या नव्या व्यक्तिरेखा आपल्या भेटीस येणार आहेत. या सहाही जणांना कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये काम करण्याचा अनुभव नसतो. पण तरीही या खयाली पुलावमध्ये ते काम करायला लागतात. यात त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. रेस्टॉरंटमधल्या किती रेसिपिज जमून येतात आणि किती बिघडतात हे ही मालिका सुरू झाल्यावरच कळेल. दिल दोस्ती दुनियादारीची संपूर्ण टीम दिल दोस्ती दोबारामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत काही नवीन कलाकारांची या मालिकेत एंट्री होणार आहे. दिल दोस्ती दोबाराची निर्मिती संतोष कणेकर करणार असून या मालिकेचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि स्वप्निल मुरकर करणार आहेत तर कथा आणि संवाद सुदीप मोडक आणि अभिषेक खणकर यांचे असणार आहेत. समीर सप्तीसकरच्या संगीताने सजलेले या नव्या मालिकेचे शीर्षकगीत असणार आहे.