Join us  

'या' गोष्टीचा 'चला हवा येऊ द्या' करताना श्रेया बुगडेला झाला सगळ्यात जास्त फायदा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 8:00 PM

श्रेया बुगडेचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमातील विनोदवीरांसोबतच कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर असो किंवा बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी असो सगळ्यांची मिमिक्री श्रेया करते आणि सर्व प्रेक्षकांना ते आवडतं देखील.

तिला हे नक्कल करणं कसं जमतं याबद्दल बोलताना ती म्हणाली, "शाळेत असताना मी आणि माझी लहान बहीण गंमत म्हणून घरात शाळेतल्या बाईंची नक्कल करायचो. शाळेत काय काय झालं हे आईला सांगतानाही आमच्या नकला सुरू असायच्या. मिमिक्री वगैरे कधीच डोक्यात नव्हतं. मिठीबाई कॉलेजमध्ये असताना पाचही वर्ष युथ, आयएनटी यासारख्या इंटरकॉलेज स्पर्धा केल्या. कॉलेजमध्ये लवकर येणं, रात्री उशिरापर्यंत एकांकिकांच्या तालमींसाठी थांबणं हे सगळं अनुभवलं. कॉलेज ते घर हा प्रवास मी ट्रेननं करायचे.

त्यामुळे ट्रेनमध्ये पिना विकणारी बाई, गाणं गाणारे भिकारी, कॉलेजमध्ये येणाऱ्या हायफाय मुली, चहावाला अशा सगळ्यांचे आवाज, हावभाव याचं निरीक्षण सुरू करायचे. त्यामुळे जेव्हा मला मिमिक्री कर असं सांगण्यात आलं, तेव्हा या निरीक्षणाच्या सवयीचा मला खूप फायदा झाला. यातूनच मी साकारलेली अनुष्का शर्मा, स्पॅनिश बाई आणि इतर अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या."

टॅग्स :श्रेया बुगडे