Join us  

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री करतेय आयपीएलचं अँकरिंग; 'देवमाणूस' मालिकेतही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 6:39 PM

अनेकदा सेलिब्रिटी आयपीएलच्या स्टेडियममध्ये आवडत्या टीमला चिअरही करताना दिसतात. आता मात्र एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चक्क आयपीएलचं अँकरिंग करताना दिसत आहे.

आयपीएलचा १७वा हंगाम जोरदार सुरू आहे. क्रिकेटप्रेमीही आयपीएलचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटीही क्रिकेटप्रेमी असून आयपीएलचे चाहते आहेत. अनेकदा सेलिब्रिटी आयपीएलच्या स्टेडियममध्ये आवडत्या टीमला चिअरही करताना दिसतात. आता मात्र एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चक्क आयपीएलचं अँकरिंग करताना दिसत आहे. अभिनेत्रीने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या प्रकाश नागेश सध्या चर्चेत आहे. ऐश्वर्या आयपीएलच्या १७व्या हंगामाचं मराठीतून अँकरिंग करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. आयपीएल अँकरिंग करतानाचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने अनुभव सांगितला आहे. "२६ मार्च २०२३...आयपीएलसाठी अँकरिंग करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मनामध्ये भीती, दडपण आणि उत्साह घेऊन मी स्टुडिओमध्ये पोहोचले. या शोमध्ये गेस्ट होते सिद्धेश लाड आणि अतुल बेदाडे... अनेक नवीन गोष्टी मला इथे पाहायला आणि शिकायला मिळाल्या. अनेक तांत्रिक गोष्टी समजून घेता आल्या. आता नवीन येणाऱ्या शूटसाठी मी उत्सुक आहे," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'देवमाणूस' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतून ऐश्वर्या घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अपर्णा ही भूमिका साकारली होती. याशिवाय तिने सौंदर्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता. ऐश्वर्याने न्यूज चॅनेलचं अँकरिंगही केलं आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२४टिव्ही कलाकार