Join us  

मेरे साई या मालिकेत अरुण सिंह साकारणार देवीदासाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 8:50 AM

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अरुण सिंह लवकरच भारतीय टेलिव्हिजनवर एका नव्या रूपात दिसणार आहे. अरुणने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आणि टीव्ही ...

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अरुण सिंह लवकरच भारतीय टेलिव्हिजनवर एका नव्या रूपात दिसणार आहे. अरुणने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे,गदर – एक प्रेम कहानी, पीके, टॉयलेट – एक प्रेम कथा, अक्स, तेरे नाम, अशोका द ग्रेट, चलते चलते यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले आहे. अरुणने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील अनेक वेळा काम केले आहे. लवकरच तो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिकेत देवीदासाच्या भूमिकेत दिसणार आहे. देवीदास एक ज्ञानी गुरू असून त्याने अनेक तीर्थक्षेत्री जाऊन ज्ञान संपादन केलेले आहे, असा अनेक आख्यायिकांमध्ये उल्लेख आहे. त्याच्या या भूमिकेविषयी अरुण सिंहला विचारले असता तो सांगतो, “होय, मी देवीदासाची भूमिका साकारत आहे. देवीदास हा देवाच्या भक्ती मध्येच सतत तल्लिन असतो. मालिकेच्या आगामी कथेनुसार अनेक वर्षांनी तो हिमालयतून शिर्डीला परततो आणि त्याच्या लक्षात येते की, गावात सर्वत्र साईंची चर्चा आहे. साईंची चर्चा ऐकल्यावर त्याचा अहंकार दुखावतो आणि साई आणि त्याच्यामध्ये देव आणि धर्माबाबत कोणाला अधिक ज्ञान आहे याचा निर्णय करण्यासाठी तो त्यांना आव्हान देण्याचे ठरवतो. देवीदासची भूमिका मालिकेत खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला मी सुरुवात केली असून मेरे साईच्या सेट्सवर काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे. मेरे साईच्या संपूर्ण सेटवर सकारात्मक वातावरण पाहायला मिळते. मी पहिल्यांदा या सेटवर आलो तेव्हा एखाद्या धर्मक्षेत्री आल्याचा अनुभव मला आला. मालिकेचे सर्व कलाकार आणि तांत्रिक विभागातील मंडळी नेहमीच मदतीला तत्पर असतात. माझी ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे.”साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचा उद्देश समस्त प्रेक्षकवर्गात दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करणे हा आहे. या मालिकेत अबीर सूफी साईबाबांची भूमिका साकारत आहे. Also Read : ​प्यारेलालजी यांनी ‘मेरे साई’साठी तयार केले गीत