Join us  

डान्स प्लसमधील परफॉर्मन्सद्वारे फील क्य्रू ग्रुपने दिला हा सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:10 PM

‘फील क्य्रू’ या स्पर्धकांनी देशात मुलींवर होत असलेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांना आणि त्यामुळे मुलींसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणाला वाचा फोडणाऱ्या नाट्याने उपस्थितांना हेलावून सोडले.

समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे कला हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. ‘डान्स प्लस 4’ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नुकतेच नेमके हेच घडले. देशात अलीकडेच झालेल्या बलात्काराच्या एका भीषण घटनेकडे या कार्यक्रमाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. सर्व मुलांचा समावेश असलेला ‘फील क्य्रू’ या स्पर्धक गटाने देशातील मुलींच्या सुरक्षिततेचा स्तर वाढावा, असे आवाहन करणाऱ्या एका हृदयस्पर्शी गीतनाट्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले होते.

‘फील क्य्रू’ या स्पर्धकांनी देशात मुलींवर होत असलेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांना आणि त्यामुळे मुलींसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणाला वाचा फोडणाऱ्या नाट्याने उपस्थितांना हेलावून सोडले. त्यांची ही कामगिरी इतकी भारावून टाकणारी होती की कार्यक्रमाचे परीक्षक तसेच सुपरजज रेमो डिसुझा हे काही काळ अवाक झाले. अभिनेत्री मौनी रॉय आणि गीता कपूर यांनी हा परफॉर्मन्स झाल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. परीक्षक पुनित पाठक याने आपल्या सोशल मीडियाच्या हॅण्डलद्वारे या दोघींच्या प्रतिक्रिया अनेकांपर्यंत पोहोचविल्या. या परफॉर्मन्सविषयी मौनी रॉय म्हणाली, “फील क्य्रू या स्पर्धकांची ही कामगिरी पाहिल्यावर मला वाटतं की आपण कशाला ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ ही मोहीम चालवितो? कारण मुलींशी कसं वागावं, हे समजावून सांगण्याची खरी गरज तर मुलांना आणि पुरुषांना आहे. मुलींशी वागताना काय योग्य आणि काय अयोग्य आहे, याचं प्रशिक्षण आपल्या घरातील सर्व मुलांना लहानपणापासूनच देण्याची गरज आहे. तसं झालं, तरच ही मुलं मोठेपणी महिलांचा आदर करणारे पुरुष बनतील. मला या स्पर्धकांची ही कामगिरी फारच आवडली आणि पुनित पाठकच्या संघात इतके गुणी स्पर्धक आहेत, हे पाहून मला खूप आनंद झाला.”

नृत्यदिग्दर्शिका गीता कपूरने आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून या परफॉर्मन्सची स्तुती केली, “कृपा करून पाहा… कृपा करून त्यातून शिका… समजून घ्या… आणि कृपा करून त्याचा आदर राखा!” या स्पर्धक मुलांवर महिलांचा आदर करण्याचे संस्कार केल्याबद्दल त्यांच्या मातांचे आभार. फील क्य्रूने आपल्या गाण्यातून जो संदेश दिला आहे... त्यांनी दिलेला हा संदेश लोकांनी गंभीरपणे मनावर घेतल्यास ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या मोहिमेऐवजी ‘बेटों को सिखाओ’ ही मोहीम सुरू करावी लागेल. फील क्य्रूमधील या मुलांनी हा संदेश फारच उत्तमपणे सादर केला आहे.”

टॅग्स :डान्स प्लस 4