Join us  

CoronaVirus: 'रात्रीस खेळ चाले'मधील या अभिनेत्रीचा नवरा आहे पोलीस, कोरोना काळात बजावताहेत कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:26 AM

या अभिनेत्रीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसेच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे त्यामुळे सर्व कलाकार घरीच आहेत.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले. इतक्या कठीण काळात ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशातील बांधवांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत आहेत. अशातच पोलिसांना मारहाण केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

वच्छी म्हणजेच संजीवनी पाटील यांचे पती पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पोलिसाची पत्नी या नात्याने संजीवनी या घटनांवर व्यक्त झाल्या आहेत.

याबद्दल संजीवनी म्हणाली, कठीण प्रसंगी पोलीस नेहमी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे आपण या कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी घरीच थांबले पाहिजे. सरकारी आदेशांचे पालन केले नाही तर याहून कठीण परिस्थिती ओढवेल. आपलेच रक्षण करणाऱ्या पोलिसांना मारहाण करणाऱ्या घटना समोर आल्यावर माझा खूप संताप होतो.

सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी पोलीस, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. हे लोक त्यांच्या घरच्यांसोबत जराही वेळ घालवत नाही आहेत आणि अशातच काही लोक ऐकत नसल्यामुळे पोलिसांच्या कामात आणखीन भर पाडत आहेत.

टॅग्स :रात्रीस खेळ चालेकोरोना वायरस बातम्या