Join us  

चला हवा येऊ द्या मधील हा प्रसिद्ध अभिनेता दिसणार डॉक्टर डॉन या मालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 5:50 PM

चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकाराची आता डॉक्टर डॉन या मालिकेत एंट्री होणार आहे.

ठळक मुद्देझी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेत सागर कारंडेची एंट्री होणार असून या मालिकेत तो मोनिकाचा मित्र विक्रांत आणि कॉलेजचा डीन असणार आहे.

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरून हसवतात. याच मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडेची आता झी युवावरील प्रसिद्ध मालिकेत एंट्री होणार आहे.

झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेत सागर कारंडेची एंट्री होणार असून या मालिकेत तो मोनिकाचा मित्र विक्रांत आणि कॉलेजचा डीन असणार आहे. आता तो देवा आणि मोनिकाच्या मध्ये येणार का किंवा मोनिका देवाला सोडून विक्रांत सोबत जाणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळणार आहे. या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सागर म्हणाला, "बऱ्याच दिवसांपासून डॉक्टर डॉन मालिकेत कॉलेजचे डीन विक्रांत यांच्याबद्दल खूप चर्चा चालू आहे आणि विक्रांतची भूमिका मला साकारायला मिळाली याबद्दल मी खूप आनंदी आहे. खूप वर्ष कॉमेडी केल्यानंतर कलाकाराला नेहमीच काहीतरी वेगळं करायची इच्छा असते आणि मी नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या शोधात असतो. 

सागर पुढे सांगतो, याआधी मी काही मालिकांमध्ये गेस्ट एपियरन्स केलं आहे. ४ - ५ भागांसाठी ती व्यक्तिरेखा असून तिची सुरुवात व शेवट मला माहिती असतो. पण इथे डॉक्टर डॉन मध्ये मला विक्रांतची सुरुवात कळली आहे, त्याचा शेवट काय असणार आहे हे प्रेक्षकांप्रमाणेच माझ्यासाठी देखील सरप्राईज असणार आहे. पण विक्रांतची व्यक्तिरेखा खूपच इंटरेस्टिंग आहे. तो खूपच आनंदी माणूस आहे, सगळ्यात मिळून मिसळून राहणार आहे, विद्यार्थांना देखील मित्राप्रमाणे वागवणारा आहे आणि त्याचे मोनिकावर मनापासून प्रेम आहे, म्हणूनच तो भारतात परत आला आहे. एकाच व्यक्तिरेखेच्या अनेक छटा सादर करण्याची संधी मला विक्रांत साकारताना मिळाली आहे. विक्रांत साकारताना मी माझे १००% देतोय आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."

टॅग्स :चला हवा येऊ द्या