Join us

​Breaking ! जय मल्हार घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 10:08 IST

जय मल्हार ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका आज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे. ...

जय मल्हार ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका आज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे. या मालिकेत जय मल्हार ही भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेला तर या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आज त्याची ओळख ही खंडोबाच बनली आहे. पण आता प्रेक्षकांची ही आवडती मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे.या मालिकेचे कथानक, या मालिकेतील व्यक्तिरेखा सगळ्याच प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने सुरभी हांडे, इशा केसकर यांना प्रसिद्धीझोतात आणले. या मालिकेतील कलाकार, कथानक यांसोबतच या मालिकेच्या शीर्षकगीताची चांगलीच चर्चा झाली. आज या मालिकेचे शीर्षकगीत अनेक जणांची कॉलर ट्युन बनली आहे. तसेच या मालिकेतील बानूबया या गीतालादेखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे गाणे लग्नसमारंभ, कार्यक्रमात अनेकवेळा आपल्याला ऐकायला मिळते. पण आता ही मालिका तीन वर्षांनंतर संपणार आहे. जय मल्हार ही पौराणिक मालिका खंडोबा यांच्या आयुष्यावर आधारित होती. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. पण खंडोबांवर कधीच कोणती मालिका बनवण्यात आली नव्हती. जय मल्हार या मालिकेमुळे खंडोबाचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. या मालिकेनंतर जेजुरीला जाणाऱ्या लोकांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. या मालिकेला सगळ्याच वयातील लोकांची पसंती मिळाली. मालिका सुरू झाल्यानंतर गणपतीमध्ये जय मल्हारच्या रूपात आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला मिळाली. तसेच अनेक वेशभूषा स्पर्धांमध्येदेखील जय मल्हारची छाप दिसली.  जय मल्हार या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजनने केली होती तर या मालिकेचे लेखक संतोष अयाचित आहेत. ही मालिका पुढील काहीच दिवसांत प्रेक्षकांना रामराम ठोकणार आहे.