Join us  

बॉलिवूड कोरियोग्राफर ओमकार शिंदेचे मराठीत 'प्रयोग पे प्रयोग'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 6:30 AM

ओमकार शिंदेने बऱ्याच हिंदी डान्स रिएलिटी शोमध्ये कोरियोग्राफर म्हणून काम केले आहे.

नच बलिये, डीआयडी लिट्ल मास्टर या हिंदी रिएलिटी शोच्या विजेत्या स्पर्धकांचा कोरियोग्राफर म्हणून नावारूपास आलेला ओंकार शिंदे मराठी रिअॅलिटी शोमध्येदेखील आपल्या हटके नृत्यदिग्दर्शनाची छाप पाडण्यास यशस्वी झाला आहे. आपल्या नृत्यदिग्दर्शनात नवनवीन प्रयोग करत त्याने मान्यवरांचेच नव्हे तर प्रेक्षकांचेदेखील मन जिंकले आहे. प्रत्येक डान्स प्रकारात पारंगत असलेल्या ओंकारने 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर अनेक प्रयोग करत त्याने सर्वांना अचंबित केले आहे. विविध हिंदी रिएलिटी शोचा दांडगा अनुभव असल्याकारणामुळे, त्याचे 'प्रयोग पे प्रयोग' प्रेक्षकांनादेखील आवडू लागले आहेत. आयुषी भावे हिने सादर केलेली रिव्हर्स लावणी ही त्याच्याच नावीन्यपूरक संकल्पनेतून साकार झालेली अफलातून कलाकृती होती. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी वेस्टर्न आणि पारंपरिक डान्स प्रकारात नवनवीन शोध आणि प्रयोग करताना, लोकनृत्यांमध्येही असे आगळेवेगळे एक्स्पेरिमेंट करणारा हा पहिलाच अवलिया आहे. 

नच बलिये सीजन ९ ची सेलिब्रिटी जोडी प्रिन्स नरुला- युविका चौधरी तसेच सीजन ५ च्या जय भानुशाली - माही विज या जोडीच्या अंतिम विजयाचा शिलेदार ओंकार हाच होता. शिवाय नच बलियेच्या आठव्या भागात तो अभिनेता सिद्धार्थ जाधवचा कोरिओग्राफर होता. कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळते, कोरिओग्राफर्स मात्र तितके प्रकाशझोतात येत नाहीत, याची त्याला खंत वाटते. पण याच इंडस्ट्रीमध्ये काम करून, काॅरिओग्राफर्सदेखील प्रसिद्धीझोतात येऊ शकतात हे त्याला सिद्ध करायचे आहे. 

आपल्या हिंदी कारकिर्दीबद्दल तो बोलतो की, 'रिएलिटी शो करताना आधी थोडी भीती वाटायची, की हिंदीमध्ये मराठी लोकांना तितकासा वाव मिळत नाही. आता मात्र याच इंडस्ट्रीमध्ये काम करत आपण त्यांच्या पुढे जातोय याचा अभिमान वाटतोय. हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठी कोरिओग्राफर आपली छाप पाडताहेत हे पाहून खूप छान वाटतंय.’ 

टॅग्स :नच बलिये