Join us  

Birthday Special: ...तर दुर्योधनाच्या भूमिकेत दिसले असते मुकेश खन्ना; अशी मिळाली होती भीष्म पितामहची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 10:25 AM

भीष्म पितामह यांची भूमिका मुकेश यांना कशी मिळाली, यामागे एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. खुद्द मुकेश खन्ना यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता.

ठळक मुद्देमुकेश खन्ना यांनी १९८४ मध्ये कलाविश्वात पाऊल ठेवले. सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज (२३ जून) मुकेश खन्ना यांचा वाढदिवस. ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भीष्म पितामहची भूमिका मुकेश यांना कशी मिळाली, यामागे एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. खुद्द मुकेश खन्ना यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता.

‘महाभारत’ या मालिकेत भीष्म पितामह यांची जबरदस्त भूमिका साकारणा-या मुकेश खन्ना यांना सर्वात आधी दुर्योधनच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. परंतु मुकेश खन्ना यांनी ही भूमिका साकारण्यासाठी नकार दिला होता. कारण त्यांना निगेटीव्ह भूमिका साकारायची नव्हती. खरे तर मुकेश खन्ना ‘महाभारत’ या मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारू इच्छित होते. पण ही भूमिका त्यांच्या हातून निसटली.

यानंतर त्यांना गुरु द्रोणाचार्याच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. ही भूमिका साकारण्यातही मुकेश खन्ना  रस नव्हता. पण तरीही नाराजीने का होईना त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला. पण ही भूमिकाही त्यांच्या हातून गेली. अर्थात यानंतर त्यांच्याकडे भीष्म पितामहची भूमिका चालून आली. मुकेश खन्ना यांनी आनंदाने ही भूमिका स्वीकारली. ही भूमिका त्यांनाच नाही तर त्यांच्या वडिलांनाही आवडली होती. याच एका भूमिकेने मुकेश यांच्या अ‍ॅक्टिंग करिअरला उभारी दिली.

मुकेश खन्ना यांनी १९८४ मध्ये कलाविश्वात पाऊल ठेवले. सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही  काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. त्यांच्या या भूमिकेलाही चाहत्यांची चागंलीच पसंती मिळली होती.

टॅग्स :मुकेश खन्ना