‘बिग बॉस मराठी 3’ (Bigg Boss Marathi 3 ) हा छोट्या पडद्यावरचा मोठा शो सध्या वेगवेग्या कारणांनी चर्चा आहे. कधी स्पर्धकांची चर्चा, कधी टास्कची तर कधी चावडीवरच्या शाळेची. शो जिंकायचाच, यासाठी घरातील सर्वच सदस्यांची धडपड सुरू आहे. टास्क आला की, घरातील सर्वजण एकमेकांच्या विरोधात खेळतात आणि टास्क संपला रे संपला की, एकमेकांसोबत गप्पागोष्टीही करतात. अशात गप्पा रंगल्या असताना विकास पाटीलने (Vikas Patil ) असा काही खुलासा केला बिग बॉसच्या घरातील वातावरण काही क्षणांसाठी धीरगंभीर झाले. होय, आठ वर्षांच्या मुलाच्या आजारपणाचा खुलासा विकासने यावेळी केला.माझा मुलगा 8 वर्षांचा आहे. पण अजूनही अंथरूणाला खिळलेला आहे. डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. पण त्याला ठीक व्हायला अजून काही काळ जावा लागेल, असं विकासने यावेळी सांगितलं.
मुलाला नेमकं काय झालं, हेही त्यानं सांगितलं. तो म्हणाला, माझा मुलगा आता 8 वर्षांचा आहे. 3 वर्षांचा असताना त्याला अपघात झाला. सोसायटीच्या मुलांसोबत खेळत असताना तो पाण्याच्या टाकीत पडला. बराच वेळ तो पाण्यातच होता. याचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम झाला. आता 8 वर्षांचा झालाय पण अजूनही तो अंथरूणाला खिळलेला आहे. विकासच्या मुलाच्या प्रकृतीबद्दल ऐकून सगळेच भावुक झालेत. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.विकास पहिल्या आठवड्यात मागे राहिला असला तरीही दुस-या आठवड्यानंतर विकासने प्रेक्षकांच्या मनावर पकड घेतली आहे. विकासने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात मराठी नाटकांपासून केली होती. हमिदाबाईची कोठी हे त्याचं गाजलेलं नाटक़ अनेक मराठी चित्रपटातही त्याने वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत. यात असा हा अतरंगी, तुझ्याविना मरजांवा, दिशा, गोळा बेरीज, अय्या, तुकाराम या चित्रपटांचा समावेश आहे.