Join us  

Bigg Boss Marathi 3: 'मुंबईनं मला कधीच उपाशी ठेवलं नाही', मुंबईतील लोकांच्या मदतीसाठी हा अभिनेता करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 7:00 AM

हा अभिनेता बिग बॉसच्या घरात खूप चर्चेत येतो आहे.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये अविष्कार दारव्हेकर लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे. जुईली या चित्रपटाच्या माध्यमातून अविष्कार दारव्हेकरने मराठी सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. ह्या गोजिरवण्या घरात, आभाळमाया, दामिनी, कुटुंब, देवाशपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही, ती आणि इतर, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा चित्रपट आणि मालिका तसेच नाटकांमध्ये तो झळकला आहे. भूतनाथ या बालनाट्याची त्याने सीरिज काढून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 

अविष्कारला अभिनयाचे बाळकडू त्याला त्याच्या घरातूनच मिळाले होते. अविष्कारचे आजोबा पुरुषोत्तम दारव्हेकर प्रसिद्ध नाट्यकर्मी होते. ते नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचे पान म्हणून ओळखले जात. कट्यार काळजात घुसली हे नाटक त्यांनी लिहून रंगभूमीवर आणले होते. याच नाटकावर आधारित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट बनवण्यात आला होता. दिग्दर्शक आणि गीतकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. ‘रंजन कला मंदिर’ या नावाने त्यांनी स्वतःची नाट्यसंस्था उभारली होती. उपाशी राक्षस, मोरूचा मामा, पत्र्यांचा महल, आब्रा की डाब्रा , स्वर्गातील काळा बाजार, कट्यार काळजात घुसली या नाटकांची मेजवानी त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. तर अविष्कारचे वडील डॉ. रंजन दारव्हेकर हे देखील नाट्यकर्मी म्हणून ओळखले जातात. 

मुंबईने मला कधीच उपाशी ठेवले नाही - अविष्कार इतके असूनही सिनेइंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी अविष्कारने आपली पावले मुंबईकडे वळवली. एक दोन वर्षात फारसा जम न बसल्याने आर्थिक टंचाई वाटू लागली. एकदा महिन्याच्या शेवटी खिशात दीडच रुपया होता त्यावेळी दादरला दीड रुपयात वडा पाव मिळायचा. मी वांद्रेला होतो पण दादरला जायचे म्हटले तर ५ रुपये तिकीट होते. त्यादिवशी खूप भूक लागली होती बोरिवली पर्यंतच तिकीट अगोदरच काढले होते शेवटी हतबल होऊन देवाला प्रार्थना केली की आज मला उपाशी झोपवू नकोस. अशी प्रार्थना करताच एक मित्र बसस्टॉपवर भेटला मला घरी घेऊन गेला आणि पोटभर जेवू घातले. या मुंबईने मला कधीच उपाशी ठेवले नाही असे अविष्कार म्हणतो.

कुकिंगची आवड आधीपासून होती - अविष्कार

चित्रपट मालिकेतील काम कमी झाल्यावर स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार केला. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात दुकान अगोदरच होते फक्त त्याला फूड कॉर्नर बनवायचे ठरवले. ५० रुपयात चार चपाती, भाजी, भात वरण अशी थाळी विकायचो त्याचे आता ७० रुपये केले आहेत असे तो म्हणतो. कुकिंगची आवड पाहिल्यासपासूनच होती त्यामुळे या व्यवसायाची गोडी अधिकच वाढली. आर के वैद्य रोडवर दादर येथे पाटील्स किचन या नावाने तो स्वतःचे फूड कॉर्नर चालवतो आहे. मटकी उसळ, ज्वारीची भाकरी, व्हेज कुर्मा, मसाला चहा अशा पदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक खवय्ये त्याच्या फूड कॉर्नरला भेट देतात. 

टॅग्स :बिग बॉस मराठी