Join us  

बिग बॉस मराठी २ स्पर्धक सुरेखा पुणेकर यांच्यावर या कारणामुळे आली होती दागिने विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 9:00 PM

सुरेखा पुणेकर यांनी आज लावणीसमाज्ञी म्हणून आपली एक ओळख निर्माण केली असली तरी त्यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता.

ठळक मुद्देअवघं दीड हजार रुपयांचं बुकिंग झालं असल्यामुळे जागेचं भाडं, कलाकारांचे पैसे, नेपथ्याचं भाडं सारं काही त्यांना खिशातून द्यावं लागणार होतं. पण एकही रुपये उरला नसल्याने मागचा पुढचा कसलाच विचार न करता त्यांनी सोन्याचे झुमके आणि काही दागिने सोनाराला विकले होते.

सुरेखा पुणेकर सध्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात त्या स्पर्धक असून या कार्यक्रमामुळे त्या खऱ्या आयुष्यात कशा आहेत हे प्रेक्षकांना जाणून घेता येत आहेत. आज त्यांना ओळख ही त्यांच्या लावणीमुळे मिळाली आहे. सुरेखा पुणेकर यांनी आज लावणीसमाज्ञी म्हणून आपली एक ओळख निर्माण केली असली तरी त्यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचा नटरंगी नार हा कार्यक्रम नेहमीच प्रचंड हाऊसफुल असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या कार्यक्रमाची सुरेखा पुणेकर यांनी सुरुवात केली. त्यावेळी कार्यक्रमाला रसिकांचा खूपच कमी प्रतिसाद मिळत होता. सुरुवातीला तर काही प्रयोगांना त्यांना त्यांच्या खिशातले पैसे खर्च करावे लागले होते. 

सुरेखा पुणेकर यांनी नटरंगी नारच्या अगदी सुरुवातीच्या काळात कोल्हापूरला एक प्रयोग केला होता. या प्रयोगाला चंद्रकांत, सुर्यकांत, राजशेखर हे ज्येष्ठ अभिनेते आल्यामुळे त्या प्रचंड खूश होत्या. पण दुसरीकडे या प्रयोगाचे बुकिंग खूपच कमी झाले होते. कोल्हापुरच्या प्रयोगानंतर पुढचा प्रयोग इचलकरंजीला होता. त्यामुळे साऱ्यांचे पैसे देऊन केवळ प्रवासापुरता आणि खाण्यापिण्यासाठी पुरेल इतकाच पैसा सुरेखा पुणेकर यांच्याकडे उरला होता. इचलकरंजीच्या प्रयोगालाही बुकिंग झालं नाही तर तिथे पैसे कुठून आणायचे याचाच विचार अख्ख्या प्रवासात त्या करत होत्या. पण या प्रयोगाला देखील त्यांच्या पदरी निराशाच आली.

इचलकरंजीच्या प्रयोगाचं बुकिंग आधीच्या सगळ्या प्रयोगांपेक्षाही खूपच कमी झालं होतं. अवघं दीड हजार रुपयांचं बुकिंग झालं असल्यामुळे जागेचं भाडं, कलाकारांचे पैसे, नेपथ्याचं भाडं सारं काही त्यांना खिशातून द्यावं लागणार होतं. पण त्यांच्याकडे एकही रुपये उरला नव्हता. त्यामुळे मागचा पुढचा कसलाच विचार न करता त्यांनी थेट सोनाराचं दुकान गाठलं. सोन्याचे झुमके आणि काही दागिने त्या सोनाराला विकले. त्यावेळी त्या दागिन्यांचे त्यांना ३५ हजार रुपये मिळाले होते. यातून त्यांनी सगळ्यांचे पैसे दिले.

टॅग्स :बिग बॉस मराठीसुरेखा पुणेकर