Join us  

अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:42 PM

'भेटी लागी जीवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे.

ठळक मुद्देअरूण नलावडे तात्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला

सोनी मराठी वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या वाहिनीवरील 'भेटी लागी जीवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. या मालिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि कथा. तीन पिढ्या, त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावर याच्या अवती-भवती फिरणारी भेटी लागी जीवाची कथा खूप सुंदर पद्धतीने मांडली जात आहे आणि यातील ३ पिढ्यांतील प्रमुख पुरुष पात्र अरुण नलावडे (तात्या), समीर धर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग) यांनी पडद्यावर सादर केली आहे.

एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरूण नलावडे तात्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रम करणाऱ्या तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱ्या ओव्या आणि त्या ओव्यांभोवती गुंफलेले तात्यांचे आयुष्य. डिजे-रिमिक्सच्या या काळात गवळण, भारूड, भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणे दुर्मिळच. मात्र सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने कानी पडणारे हे शब्द प्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडून या एकंदर नाट्याला मिळणारी भारूडाची जोड कौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनच नाही तर अरूण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेले संवाद ही तितक्याच ताकदीचे आहेत. हल्लीच्याच एका भागात, आशिर्वादाला ओझे समजून परत करायला आले की काय... म्हणणाऱ्या तात्यांचे संवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्या अनुशंगाने सादर होणारे भारूड प्रेक्षकांना आपल्या मुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे.आजोबा आणि नातू यांची योगायोगाने झालेली भेट प्रेक्षकांसाठी आनंददायी क्षण असेल पण त्यांच्या नात्याची खरी ओळख त्यांना कधी होईल हे जाणून घेण्यासाठी पण प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. आपल्या वडीलांना भेटवण्यासाठी जेव्हा विहंग तात्यांना घेऊन त्याच्या घरी जाईल तेव्हा काय घडेल अन् कसे घडेल हे पाहण्यासाठी भेटी लागी जीवा मालिका पाहावी लागेल.

टॅग्स :अरुण नलावडेसोनी मराठी