Join us  

विनोदी मालिका करण्यात वेगळीच मजा - अंकिता शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:30 PM

सोनी सब वाहिनीवर 'बिचवाले -बापू देख रहा है' ही नवीन विनोदी मालिका लवकरच दाखल होत आहे. या मालिकेत अभिनेत्री अंकिता शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देअंकिता शर्मा दिसणार शीतलच्या भूमिकेत'बिचवाले' ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी - अंकिता शर्मा

सोनी सब वाहिनीवर 'बिचवाले -बापू देख रहा है' ही नवीन विनोदी मालिका लवकरच दाखल होत आहे. या मालिकेत अभिनेत्री अंकिता शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण दिल्लीत सुरू आहे. विनोदी मालिका करण्यात वेगळीच मजा असल्याचे अंकिताने सांगितले.

अंकिता शर्माने 'बिचवाले -बापू देख रहा है' या मालिकेत शीतल नामक भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल अंकिता म्हणाली की, 'या मालिकेतील माझ्या पात्राचे नाव शीतल आहे. तिला स्वतःच्या प्रतिमेची खूप काळजी असते. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत ती सतत क्लासचा विचार करत असते. उदाहरणार्थ, ती कुणाला भेटायला गेली तर, त्यांच्या घरातली जेवणासाठी वापरली जाणारी काचेची भांडी किंवा घरात वापरल्या जाणाऱ्या साबणाचा ब्रॅण्ड यावरून त्या व्यक्तीची पात्रता ठरवते. त्याचबरोबर, ती मजेशीर स्वभावाची आणि आपल्या नवऱ्यासोबत खूप रोमॅंटिकही वागते.' या मालिकेच्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली की,' सोनी सबवरची ही माझी पहिलीच मालिका आहे. दैनंदिन मालिकेच्या एका वेगळ्या प्रकाराचा भाग झाल्याचा मला खूप आनंद होतो आहे. पण बिचवालेचे चित्रीकरण करताना, मला जाणवले की विनोदी मालिका करण्यात वेगळी मजा असते. 12-13 तास चित्रीकरण केल्यानंतरही तुम्ही मानसिकदृष्ट्या थकत नाही. दुसऱ्या दिवशीही तितक्याच ताकदीने चित्रीकरण करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणारी एक चमक तुमच्यात असते. नाहीतर, मी जेव्हा सास-बहू नाट्याच्या मालिका केल्या, तेव्हा मी माझ्या घरी पोहोचेपर्यंत पूर्ण थकलेली असायचे. मला मानसिक आणि शारीरिक थकवा आलेला असायचा.''बिचवाले' ही मालिका इतर मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. कारण, ही मालिका हलकीफुलकी आहे. यातल्या प्रत्येक पात्राशी अत्यंत सहजपणे प्रेक्षक जोडला जाईल, अशी आशा अंकिताने व्यक्त केली.