Join us  

लॉकडाऊन संपल्यानंतर ही गोष्ट करण्यासाठी आतुर झालीय गॅरीची शनाया, वाचून तुम्हीही म्हणाल-शब्बास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 6:00 AM

मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत.

करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे आणि त्यामुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. या सुट्टीमध्ये कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. 

शनाया म्हणून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा केसकरसाठी टाळेबंदीतला हा काळ म्हणजे थोडीशी हवीहवीशी अशी सुट्टी आहे. एरवी मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे ज्या ज्या गोष्टी करता येत नाही त्या सगळ्या या सुट्टीत करून पाहायच्या आणि छोट्या-छोट्या गोष्टीतला भरभरून आनंद घेत पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागण्याची ऊर्जा यातून घ्यायची असं ईशा म्हणाली.

लॉकडाऊनमध्ये ईशा कसा वेळ घालवते हे विचारल्यावर ती म्हणाली, "लॉकडाऊनच्या काळात मी एक गोष्ट आवर्जून करते आहे ते म्हणजे कोणालाही कोणती अडचण आली तर मला जितकी मदत करता येईल तेवढी मी करते. चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनाही मी हे सांगते. उरलेल्या वेळात अगदी कमीत कमी आणि हाताशी असलेल्या वस्तूंमधून मला काय करता येईल मग ते स्वयंपाकघरात पिझ्झा बनवणे असो किंवा फ्रेंच फ्राईज. या गोष्टी मी घरातच बनवते आहे. माझ्या दोन मांजरी आहेत. त्यांच्याबरोबर खेळण्यात, त्यांच्यावर माया करण्यातही माझा खूप छान वेळ जातो. सध्या तरी मी पुन्हा एकदा चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट पाहाते आहे."

टॅग्स :ईशा केसकरमाझ्या नवऱ्याची बायको