Join us  

‘का रे दुरावा’नंतर जालिंदर कुंभार घेऊन आलेत ‘साथ दे तू मला’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 8:00 AM

दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांची नवी मालिका ‘साथ दे तू मला’ लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होत आहे.

अनुबंध, अनामिका, लज्जा, कालाय:तस्मै नम:, का रे दुरावा या लोकप्रिय मालिकांनंतर दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांची नवी मालिका केव्हा येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मधल्या काळात हिंदी मालिका,मराठी चित्रपट हे नवे टप्पे गाठताना वेगळे आणि लौकिकाला साजेसे दर्जेदार प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान त्याच्या समोर होते. हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारून स्टार प्रवाहवर ‘साथ दे तू मला’ ही नवी मालिका जालिंदर दिग्दर्शित करत आहे. उत्तम कथा, उत्तम कलाकार अशी भट्टी या मालिकेत जमून आली आहे. या मालिकेचे शीर्षकगीत, प्रोमो सध्या लोकप्रिय होते आहे. 

‘साथ दे तू मला’ या मालिकेत सविता प्रभुणे,आशुतोष कुलकर्णी,रोहन गुजर,प्रियांका तेंडोलकर, प्रिया मराठे, पियुष रानडे, अरुण नलावडे, मेघना वैद्य, दीपक करंजीकर, अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा पोखरणकर, ऋचा आपटे, अनिल रसाळ, रोहन पेडणेकर, वैभव राजेंद्र, आसावरी तारे, अंकित म्हात्रे, पूर्वा कौशिक, किरण राजपूत,सोनाली मगर,जय चौबे हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

घर की करियर या प्रश्नाचा सध्याचा पैलू मांडतानाच स्त्री-पुरुष नात्यांची आजची गोष्ट मांडण्याचा वेगळा प्रयत्न या मालिकेत केला आहे. आतापर्यंत टेलिव्हिजनवर हाताळला गेलेला नाही असा विषय या मालिकेत आहे. हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यातला आहे, पण तो टीव्ही चॅनलवर कधी दाखवलाच गेला नाही. स्त्री-पुरुष नात्याचा खूप वेगळा, गोड असा हा पैलू आहे.जालिंदरने आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या सगळ्याच मालिका लोकप्रिय ठरल्या. ‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या निमित्ताने दिग्दर्शक जालिंदर म्हणाला, 'एखादी मालिका केल्यानंतर मी लगेच काही करत नाही. मी मला हवंतसं जगतो, वाचतो, लिहितो. त्यातून काहीतरी वेगळे सापडते. तसेच काहीसे ‘साथ दे तू मला’च्या बाबतीतही झाले. कथा लिहून झाली, मालिकेच्या दृष्टीने विचार सुरू केला आणि जवळपास सहा महिने व्यक्तिरेखा लिहिल्या.सर्वसाधारणपणे टीव्ही मालिका घाईघाईत होतात. लेखनाला हवा तितका वेळ दिला जात नाही. मात्र, साथ दे तू मला ही मालिका आम्ही पूर्ण तयारीनिशी केली आहे. कथेत प्रत्येक व्यक्तिरेखेचा वास्तववादी पद्धतीने बारकाईने विचार केला असल्याने लेखनाच्या पातळीवरच ही मालिका नक्कीच सकस आहे, असे जालिंदरने आवर्जून सांगितले. ‘तिच्या स्वप्नांची’ आणि नात्यांची आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘साथ दे तू मला’ मालिका ११ मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडे सात वाजता प्रसारित होणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह