नामकरणमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आदिती राठोडचे नवे रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:55 IST
नामकरण ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेने ...
नामकरणमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आदिती राठोडचे नवे रूप
नामकरण ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेने आजवर अनेक वेळा लीप घेतलेला आहे. लीपनंतर काही कलाकारांना मालिकेत निरोप देण्यात आला आहे तर काही नवे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. हे नवे कलाकार देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत आणि आता पुन्हा एकदा या मालिकेने सहा महिन्यांचा लीप घेतला आहे. नामकरण या मालिकेच्या कथानकाचा काळ सहा महिन्यांनी पुढे नेल्यावर दिसणाऱ्या भागात नील आणि अवनी विभक्त झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लीपनंतर या मालिकेच्या कथानकाला चांगलीच कलाटणी मिळणार आहे. नीलने म्हणजेच झैन इमामने आपली पत्नी अवनी म्हणजेच आदिती राठोडला कैदेत टाकले आहे. जुहीच्या हत्येत अवनीला चुकीने गोवण्यात आले असून खऱ्या खुन्यांपासून अवनीचे रक्षण करण्यासाठी नील तिला तुरुंगात टाकतो. परंतु नीलच्या या खऱ्या हेतूंबद्दल अनभिज्ञ असलेली अवनी तुरुंगातून पळ काढते आणि नीलच्या हातावर तुरी देते. दुसरीकडे नील पुढाकार घेऊन अवनी निर्दोष असल्याचे विद्युतकडून वदवून घेतो.आता मालिकेची नायिका अवनी प्रेक्षकांना एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. अवनी प्रेक्षकांना सुरुवातीपासून ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळाली होती. तिने या मालिकेत पारंपरिक बहूची प्रतिमा मोडीत काढली होती. खांद्यावरून घसरणारे ब्लाऊझ आणि डिझायनर साड्या या तिच्या लूकची चांगलीच चर्चा झाली होती. पण आता या अभिनेत्रीने तुरुंगवासातील आपल्या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. तिने आपल्या ग्लॅमरस साड्या वापरणे सोडून दिले असून ती आता कैद्यांच्या नारिंगी रंगाच्या कपड्यांत दिसणार आहे. कोणत्याही मेक-अपविना ती आता मालिकेचे चित्रीकरण करणार आहे. नारिंगी रंगाच्या जम्पसूटमध्ये तिला पाहून प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. आदितीच्या लूकप्रमाणे तिच्या व्यक्तिरेखेत देखील खूप सारे बदल होणार आहेत. आदिती तुरुंगात असताना तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अवनीची भूमिका साकारणारी आदिती तिच्या भूमिकेला मिळालेल्या या वळणामुळे सध्या प्रचंड खूश आहे.