Join us  

आदेश बांदेकरांनी "दार उघड" म्हणताच सगळ्या बायकांनी दरवाजे बंद केले अन्...; नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 11:56 AM

'होम मिनिस्टर' कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा आदेश बांदेकरांनी सांगितला आहे.

महाराष्ट्राचे लाडके भावजी अशी ओळख मिळवणारे आदेश बांदेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे त्यांनी महाराष्ट्रातील गृहिणीच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. गेली १९ वर्ष घराघरात जाऊन आदेश बांदेकर महाराष्ट्रातील कुटुंबाबरोबर गप्पा मारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. गृहिणीसाठी पैठणी घेऊन पोहचणाऱ्या आदेश भावजींवर प्रेक्षकांचेही लाडके आहेत. 

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. इतकी वर्ष अविरतपणे चालणारा छोट्या पडद्यावरील हा एकमेव कार्यक्रम आहे. याच निमित्ताने आदेश बांदेकरांनी 'मुंबई तक'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. होम मिनिस्टरच्या प्रोमोच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा आदेश बांदेकरांनी या मुलाखतीत सांगितला. 

ते म्हणाले, "लालबागमधील हाजी कसम बिल्डिंगमध्ये 'होम मिनिस्टर'च्या प्रोमोच्या शूटिंगसाठी आम्ही गेलो होतो. त्या गाण्यातील पहिलीच आरोळी दार उघड बये दार उघड अशी आहे. १३ सप्टेंबर २००४ रोजी याचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आज १९ वर्ष झाली. पण, जेव्हा मी पहिल्या चित्रिकरणासाठी गेलो तेव्हा दार उघड म्हणताच सगळ्या माऊलींनी पटापट घराची दारं बंद केली. कॅमेरा दिसल्यामुळे त्या सर्वसामान्य गृहिणी पळत होत्या." 

१९ वर्ष पूर्ण होऊनही 'होम मिनिस्टर'ची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. आजही महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीला आदेश बांदकेरांनी आपल्या घरी येऊन पैठणी द्यावी, असं वाटतं. आजही हा कार्यक्रम प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. 

टॅग्स :आदेश बांदेकरहोम मिनिस्टरटिव्ही कलाकार