Join us  

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार मृण्मयी देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 6:00 AM

चित्रपट आणि मालिकांमधील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात देखील पदार्पण केलं. आता ती सारेगमप लिटिल चॅम्प्सच्य माध्यमातून प्रेक्षकांना सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसेल.

झी मराठी वरील लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात प्रेक्षकांचे लाडके पंचरत्न रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे या पर्वात ज्युरी म्हणून सहभागी होणार आहेत आणि या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सांभाळणार आहे. 

चित्रपट आणि मालिकांमधील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात देखील पदार्पण केलं. आता ती सारेगमप लिटिल चॅम्प्सच्य माध्यमातून प्रेक्षकांना सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसेल.या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारण्या मागची भावना व्यक्त करताना मृण्मयी म्हणाली, "मी स्वतः ११वी पर्यंत शास्त्रीय संगीत शिकली आहे. माझी आई आणि बहीण गौतमी दोघी उत्तम गातात त्यामुळे घरी संगीताचा वारसा आहे. तसेच सारेगमप या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करावं हे माझ्या आईच स्वप्न होतं त्यामुळे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. 

मुळातच गाणं हा विषयच माझ्या खूप जवळचा आहे त्यामुळे मी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वासाठी खूप उत्सुक आहे." सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना सामोरं जावं लागणाऱ्या आव्हानांबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, "प्रत्येक सूत्रसंचालकाने उत्स्फूर्त असणं अतिशय महत्वाचं आहे. 

मुळातच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना सांभाळणं अवघड असतं. त्यांना बोलतं करण्याचं, त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचं, कधी एखाद्याच गाणं वाईट होऊ शकतं त्यावेळी त्यांना धीर देण्याचं आव्हान माझ्या समोर आहे. हे मला उत्तमरीत्या जमेल अशी आशा आहे."

टॅग्स :मृण्मयी देशपांडे