Join us  

या अभिनेत्याला सलमान खान मानतो फॅशन आयकॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:18 PM

दस का दम दमदार वीक एंडमध्ये मेगास्टार कमल हासन आपला लाडका मित्र आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानला भेटायला येणार असून ते दस का दम हा खेळ देखील त्याच्यासोबत खेळणार आहेत.

दस का दम या कार्यक्रमाचे आजवरचे अनेक सिझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील सलमान खान करत आहे. सलमानच्या दस का दम या कार्यक्रमाच्या या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळतो. दस का दम दमदार वीक एंडमध्ये मेगास्टार कमल हासन आपला लाडका मित्र आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानला भेटायला येणार असून ते दस का दम हा खेळ देखील त्याच्यासोबत खेळणार आहेत. छोट्या पडद्यावरचे कलाकार करण पटेल आणि शिल्पा शिंदे देखील या भागात प्रेक्षकांना दिसणार आहेत. 

विविध भाषांमधील २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करणार्‍या कमल हासन यांचे सलमानने त्यांच्या एक दूजे के लियेमधील अभिनयाबद्दल कौतुक केले. याविषयी सलमानने सांगितले की, कमल हासन यांना सलमान स्टाइल आयकॉन मानतो. एक दूजे के लिये चित्रपटात कमल हासन यांची शर्ट इन करण्याची स्टाइल सलमानला आवडायची. हा अष्टपैलू अभिनेता नेहमीच सलमानला अधिकाधिक मेहनत करून पुढे जाण्यासाठी प्रेरित करायचा. 

शिल्पा शिंदेचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की, ती कमल हासन यांच्या समोर उभी आहे. सलमानने या कार्यक्रमाच्या दरम्यान सगळ्यांना सांगितले की, कमल हासन केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नाहीत तर एक चांगले गायक देखील आहेत. त्यामुळे शिल्पाने कमल हासन यांना ‘सत्यम शिवम सुंदरम’ हे गाणे गाण्याचा आग्रह केला आणि त्यांनी देखील हे गाणे गायले.

सेटवरील सूत्राने सांगितले की, “लाखो लोक सलमानच्या डॅशिंग स्टाइलवर आणि अभिनयावर फिदा आहेत. प्रत्येकाचा कोणी तरी स्टाइल आयकॉन असतो आणि ते त्याला अनुसरतात. तसा सलमानचा आयकॉन कमल हासन आहेत. सलमान खानने जेव्हा कमल हासन यांचा चित्रपट पाहिला होता, तेव्हा त्यांची शर्ट इन करण्याची शैली त्याला खूप आवडली होती आणि अजून देखील सलमान त्याच पद्धतीने शर्ट इन करतो.”

 

टॅग्स :सलमान खानकमल हासन