Join us  

'ती परत आलीये' मालिकेतील अभिनेता नचिकेत देवस्थळीची नवी क्राईम सीरिज भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 8:10 PM

अभिनेता नचिकेत देवस्थळीच्या नवीन सीरिजला मिळतेय पसंती

‘स्टोरीटेल’वर नुकतीच ‘सायको किलर’ या क्राईम सीरिज भेटीला आली आहे. निरंजन मेढेकर लिखित आणि अभिनेता नचिकेत देवस्थळीच्या दमदार आवाजातल्या ‘सायको किलर’ला पहिल्या दिवसापासूनच श्रोत्यांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

शहरात एकामागोमाग एक घडणाऱ्या हत्याकांडांभोवती आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून पोलिसांना तपासात मदत करणाऱ्या तरुण बातमीदाराभोवती या सिरीजची स्टोरीलाईन गुंफलेली आहे. ‘सायको किलर’च्या मानसिकतेचा अभ्यास करत पोलिस अखेर त्याच्यापर्यंत पोचतात का, शहरात एकामागोमाग एक सुरू असलेली हत्याकांड थांबतात का, प्रसंगी या कादंबरीच्या नायकाला क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला आपल्या प्राणांची बाजी लावायला लागते का या प्रश्नांची उत्तंर मिळवण्यासाठी सायको किलर ऐकायलाच हवी! या सिरीजचं कथानक पुण्यात घडलेल्या सगळ्यात मोठ्या हत्याकांडावरून प्रेरित आहे. 

निरंजन मेढेकर यांनी याआधी वेगवेगळ्या मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये बातमीदारी केलेली असल्यानं बातमीदार-पत्रकारांचा संघर्ष त्यांना परिचित आहे. त्यामुळं या सिरीजमध्ये मराठी पत्रकारितेचं आणि बातमीदारांच्या भावविश्वाचं वास्तवदर्शी चित्रण झालंय. याआधी निरंजन मेढेकर यांनी ‘सीरियल किलर’ आणि ‘विनाशकाले’ या दोन क्राईम सिरीज ‘स्टोरीटेल’साठी लिहिल्या असून त्यालाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘व्हायरस पुणे’ ही त्यांनी भावानुवाद केलेली ही सायफाय थ्रिलर सिरीज मुक्ता बर्वे यांच्या आवाजात प्रसिद्ध असून, ती श्रोत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

‘सुखन’, ‘महानिर्वाण’ या नाटकांमुळे तर सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या ‘ती परत आलीये’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते नचिकेत देवस्थळी यांचा भारदस्त आवाज ‘सायको किलर’ला लाभलाय. या सिरीजमध्ये पत्रकार, पोलीस इन्स्पेक्टर, गुन्हेगार, मनोविकारतज्ज्ञ अशी वेगवेगळी पात्रं असली तरी नचिकेतने आपल्या दमदार आवाजानं आणि उत्तम व्हॉईस मॉड्युलेशनने ही सगळी पात्र अक्षऱशः जिवंत केली आहेत.

त्यामुळे नचिकेत देवस्थळी यांच्या भारदस्त आवाजात ‘सायको किलर’मधला थरार अनुभवणे ही श्रोत्यांसाठी मेजवानी ठरते आहे. ‘सायको किलर’ ही क्राईम सीरिज स्टोरीटेल मराठीवर ऐकायला मिळेल.