Join us  

अभिनय माझ्यासाठी पॅशन -किंशुक वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:14 PM

किंशुक वैद्यने ‘राजू चाचा’ या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. किंशुकने आपल्या दमदार अभिनयाने काही मालिकांद्वारेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

-रवींद्र मोरे 

‘धांगडधिंगा’ या मराठी चित्रपटापासून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारा किंशुक वैद्यने ‘राजू चाचा’ या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. किंशुकने आपल्या दमदार अभिनयाने काही मालिकांद्वारेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. किंशुक आगामी ‘कर्णसंगिणी’ या मालिकेत अर्जूनची भूमिका साकारत असून या मालिकेविषयी तसेच आतापर्यंतच्या प्रवासाबाबत त्याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!

* आजपर्यंत ऐतिहासिक प्रेमकथांवर आधारित अनेक शोज आले आहेत, तर या शोचे वेगळेपण काय आहे?- या शोमध्ये खूपच वेगळेपण आहे. महाभारतातील अर्जून आणि कर्ण यांना आपण फक्त एक योद्धा म्हणूनच ओळखतो. मात्र यांची प्रेमकथा आपण ऐकली किंवा पाहिली नाही. तसे या शोची कथा एका पुस्तकावर आधारित असून काल्पनिक आहे. या शोमध्ये या ऐतिहासिक पात्रांची प्रेमकथा बघावयास मिळणार आहे. हेच या शोचे वेगळेपण आहे. 

* ही भूमिका साकारताना काय तयारी करावी लागली?- तशी फारशी तयारी करण्याची गरज पडली नाही. मात्र भूमिकेला न्याय मिळण्यासाठी फिटनेस, फिजिक्स त्यातच भाषा म्हणजेच शूद्ध हिंदीचा सराव जास्त करावा लागला. हे कथानक ऐतिहासिक असल्याने त्यानुसार कपड्यांनीही प्राधान्य द्यावे लागले. त्याच प्रकारे पेहराव करावा लागला. 

* सध्या ऐतिहासिक शोजचा ट्रेंड दिसून येत आहे, याबाबत काय सांगाल?- प्रेक्षकांना आपली संस्कृती आवडते. ती बघायला, अनुभवायला लोकं खूपच उत्सुक असतात. यासाठी या गोष्टींवर भर दिला जातो. विशेषत: देवदेवतांचे शोजना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण पसंती देतात. त्यामुळे अशा कथानकांचा ट्रेंड जोर धरत आहे. 

* अभिनय आपल्यासाठी काय आहे?- मी चार वर्षाचा असतानाच या क्षेत्रात उडी मारली आहे. धांगडधिंगा तसेच सुना येती घरा या दोन मराठी, राजू चाचा हा हिंदी तर काही मालिकांमधून मी बालकलाकार म्हणून काम केले आहे. अभिनय माझ्यासाठी पॅशनच आहे. लहानपणी जसे एखाद्याला खेळण्याची हॉबी असते, त्याच प्रकारे अभिनय ही माझी हॉबी आहे. जणू अभिनय माझी गरजच बनली आहे. 

* बॉलिवूडमध्ये संधी मिळाल्यास कोणत्या प्रकारची भूमिका साकारायला आवडेल?- मला अगदी लहानपणापासून फायटर पायलटची भूमिका करण्याची इच्छा आहे. एखाद्या फायटर पायलटचे आयुष्य किती संघर्षमय आणि जोखमीचे असते, हे पडद्यावर साकारायला आवडेल. फायटर पायलटवर आधारित एखादी स्क्रिप्ट असेल किंवा बायोग्राफी असेल तर मला ही भूमिका साकारायला अगदी मनापासून आवडेल.

* स्क्रिप्ट निवडताना आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व देता?- सर्वप्रथम एखादे कथानक बघायला, ऐकायला प्रेक्षकांना किती मजा येईल हे मी अगोदर पाहतो. प्रेक्षक आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ काढून पडद्यासमोर बसतो तर त्या वेळेचा त्याचा सदुपयोग होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याचे मनोरंजन होण्याबरोबरच त्याला चांगला अनुभवही मिळायला हवा. 

टॅग्स :कर्णसंगिनीस्टार प्लसमुलाखत