Join us  

जिंकलंस पोरी ! 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं कोरोना काळात जपलं सामाजिक भान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 1:28 PM

कोरोनाच्या संकटात अभिनेत्री अश्विनी महांगडेने अनेक लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारते आहे. अश्विनीने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक गरजूंना मदत केली आहे. कोरोनाच्या संकटातही तिने अनेक लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत अश्विनी महांगडे हिने रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसाठी विनामूल्य जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी फक्त एकाच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा उपक्रम केला आहे. फलटण, सातारा, शिरवळ, खंडाळा, सासवड, बारामती, टिटवाळा शहर, ठाणे शहर, कल्याण शहर, अष्टा शहर, हिंडलगा बेळगाव, इस्लामपूर, नेरुळ, अंधेरी, घाटकोपर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी ही मोफत जेवणाची योजना राबवत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा परिस्थितीत रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये, यासाठी अश्विनी महांगडे आणि रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.  

तसेच अश्विनी महांगडे हिने लोकांनाही इतरांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली की, “या महासंकटात बाहेर अनेक गोष्टीची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठिकाणी आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. तुम्हीही यामधे सामील व्हा. ” 

टॅग्स :अश्विनी महांगडेकोरोना वायरस बातम्या