Join us  

Aai Kuthe Kay Karte : आम्ही बघणारे वेडे की दाखवणारे वेडे? अरूंधतीच्या अतिचांगुलपणाला प्रेक्षक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 3:46 PM

Aai Kuthe Kay Karte : ‘स्टार प्रवाह’ने ‘आई कुठे काय करते’चा नवा प्रोमो रिलीज केला आणि तो पाहून लोकांनी मालिकेच्या कथानकाची, विशेषत: अरूंधतीची मजा घ्यायला सुरूवात केली.

ठळक मुद्दे‘आई’ अर्थात अरुंधती आता देशमुखांच्या कुटुंबाचा भाग नसली तरी त्याच्या कुटुंबात मुलीच्या हक्काने नांदून प्रत्येकाची काळजी घेत आहे.

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर तर मालिकेची जोरदार चर्चा आहे. संजनाने अगदी साम-दाम-दंड-भेद वापरून  देशमुखांच्या घरात प्रवेश मिळवला. पण अनिरूद्ध पुन्हा एकदा अरूंधतीच्या बाजूनं झुकताना दिसतोय. अशात संजना अरूंधतीच्या अपमानाची एकही संधी सोडत नाही. पण अरूंधती इतकी सहनशील व दयाळू की, इतकं करूनही ती संजनाला मदत करते. पण आता कदाचित अरूंधतीचा हा पराकोटीचा चांगुलपणा पाहून प्रेक्षकांनाही कंटाळा आलाये. सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच दिसतंय.

संजना वारंवार अरुंधतीचा अपमान करत असूनही अरुंधती तिची मदत करताना दिसते. अर्थात संजनाचा मूळ स्वभाव बदलत नाही. आता काय तर   ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी संजनाचा बॉस तिला कॉम्प्रोमाइज करायला सांगतो.  अरुंधती याबाबतीतही संजनाची मदत करण्यासाठी पुढे सरसावते. तुला जी मदत हवी असेल,आम्ही सगळे करू. तू फक्त लढ, अशी म्हणत ती संजनाच्या पाठीशी उभी राहते. पण आता प्रेक्षकांनी यावरून अरूंधतीची खिल्ली उडवली आहे.

‘स्टार प्रवाह’ने ‘आई कुठे काय करते’चा नवा प्रोमो रिलीज केला आणि तो पाहून लोकांनी मालिकेच्या कथानकाची, विशेषत: अरूंधतीची मजा घ्यायला सुरूवात केली. ‘अरे कुठे नेऊन ठेवली ही सिरीअल, काही लॉजिक?’ असा सवाल एका नेटक-याने केला. ‘नक्की आम्ही बघणारे वेडे की दाखवणारे वेडे? ’,असा सवाल करत एका चाहतीने या मालिकेच्या कथानकाबद्दल संताप व्यक्त केला.‘ एवढं चांगलं या जगात कुणी नसतं आणि जरी असलं तरी ज्या बाईमुळे आपला संसार मोडला तिला एवढी मदत कुणीही करत नाही,’असं म्हणत एका युजरने अरूंधती या पात्राची मजा घेतली आहे. देवा अरूंधतीसारखी बायको सगळ्यांना भेटू दे रे... दुसरी घरात आणल्यावर काही न म्हणणारी तिच्यासोबत मिळून मिसळून राहणारी, असं लिहित एका युजरने अरूंधती व मालिकेच्या कथानकाची खिल्ली उडवली.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका