अभिनेत्री तेजश्री प्रधानला (Tejashri Pradhan) 'होणार सून मी या घरची' मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं मात्र तिची जान्हवी ही भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत असते. या मालिकेने सर्वांनाच आपलंसं केलं होतं. अतिशय गोड प्रेमकहाणी, छान कुटुंब, प्रत्येकाच्या भूमिकेतून मिळणारे संदेश यामुळे मालिका सर्वांच्या जवळची होती. या मालिकेतली तेजश्रीची सावत्र आई आठवतेय का? खलनायिकेचं पात्र साकारणाऱ्या त्या अभिनेत्रीचा सर्वच रागराग करायचे इतकं सुंदरपणे त्यांनी ते पात्र साकारलं होतं. तेजश्री नुकतीच ऑनस्क्रीन आईला भेटली.
'होणार सून मी या घरची' मालिकेत अभिनेत्री आशा शेलार चांदोरकर यांनी जान्हवी आणि पिंट्याच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांचं पात्र आठवलं तरी अनेकांना राग येतो. असं उत्तमरित्या त्यांनी ती भूमिका निभावली. नुकतंच तेजश्रीने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. एका कार्यक्रमातला हा फोटो आहे. यामध्ये तेजश्री लाल वनपीसमध्ये दिसत आहे तर आशा या पिवळ्या साडीत दिसत आहेत. तेजश्री लिहिते, "मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि तू सर्वांसाठीच प्रेरणा आहेस."
तेजश्री आणि अभिनेत्री आशा यांची भेट कशानिमित्त झाली हे मात्र कळू शकलेलं नाही. पण इतक्या वर्षांनी त्यांना एकत्र पाहून चाहतेही सुखावलेत. २०१६ साली मालिका संपली. तीन वर्ष मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सहा सासवा आणि सून जान्हवी यांचं नातं, श्री-जान्हवीची लव्हस्टोरी सगळंच खूप सुरेख होतं.