Join us  

'नाच गं घुमा' मध्ये काम का केलं नाहीस? निर्माता स्वप्नील जोशीने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 4:48 PM

'नाच गं घुमा' सिनेमाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला.

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' (Naach Ga Ghuma) हा आगामी मराठी सिनेमा काही दिवसात प्रदर्शित होत आहे. मुक्ता बर्वे, नम्रता आवटे, सारंग साठे मुख्य भूमिकेत आहेत. घराघरात असलेली मदतनीस म्हणजेच कामवाली बाई आणि मालकीण यांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. जेव्हा एक दिवसही कामवाली बाई सुट्टी घेते तेव्हा काय तारांबळ उडते याची गंमतजंमतही सिनेमात बघायला मिळेल. सिनेमाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. 

सिनेमात सारंग साठेने मुक्ताच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता स्वप्नील जोशी हा 'नाच गं घुमा'चा निर्माता आहे.  सिनेमात तू अभिनेता म्हणूनही का दिसला नाही असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर स्वप्नील म्हणाला, "मला असं वाटतं की निर्मात्याचं प्रमुख काम काय आहे तर दिग्दर्शकाला जसा चित्रपट दिसतो तसा सिनेमा बनवण्यासाठी त्याला मदत करणं. तो निर्माता अभिनेताही आहे म्हणून त्याला घ्या असं नाही होऊ शकत. पहिल्या दिवसापासूनच आमच्या दिग्दर्शकाला या तीन भूमिकांसाठी हे तीन कलाकार तिथे दिसले. त्यामुळे निर्माता म्हणून आमचं हेच कर्तव्य आहे की त्याच्या व्हिजनच्या आपण किती जवळ जायला आपण मदत करु शकतो. त्यामुळे सिनेमात काम करण्याचा हा अट्टहास कधीच नव्हता. मधुगंधाही लेखिका आहे त्यामुळे तीच अभिनेत्रीही हवी असंही नाही होऊ शकत. सिनेमा अशा प्रकारे बनू शकत नाही. प्रत्येक चित्रपटाचा निर्माता हा याप्रकारे सिनेमात असतोच. त्यासाठी पडद्यावर दिसायची गरज नाही."

'नाच गं घुमा' 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर, गाणी सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. चाहत्यांमध्ये  सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी ताणली आहे. स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, बालकलाकार मायरा वायकुळ यांचीही सिनेमात भूमिका आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीमराठी अभिनेतामराठी चित्रपट