Join us  

'आर्या 3' मधून सुश्मिताचा शेवटचा वार, 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा अंतिम भाग; टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 10:53 AM

सुश्मिता सेनच्या 'आर्या' वेबसिरीजला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने (Sushmita Sen) 2020 साली 'आर्या' (Aarya) वेबसिरीजमधून दमदार कमबॅक केले होते. यानंतर सिरीजचा दुसरा भागही आला जो हिट झाला. आता यावर्षी 'आर्या 3' रिलीज होत आहे जो सिरीजचा शेवटचा सिझन असणार आहे. नुकतीच 'आर्या 3'ची घोषणा झाली आहे. निर्मात्यांनी टीझरसोबतच रिलीज डेटही जाहीर केली आहे.

सुश्मिता सेनच्या 'आर्या' वेबसिरीजला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अॅक्शन आणि दमदार कहाणी यामुळे ही सिरीज प्रेक्षकांनी खूप भावली. सुश्मिताच्या अभिनयानेही प्रेक्षकांचं मन जिंकलं.  'आर्या 3' च्या शेवटच्या सिझनचं नाव 'आर्या अंतिम वार' आहे. 'आर्या 3' ९ फेब्रुवारी रोजी हॉटस्टारवर रिलीज होत आहे. सोबतच निर्मात्यांनी 'आर्या 3'चा टीझरही रिलीज केला आहे. यामध्ये आर्याच्या जगाची झलक दाखवण्यात आली आहे. मागील एपिसोड्समध्ये आर्या आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जात होती. आता निर्मात्यांनी आर्या 3 मध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की सुश्मिता सेनला गोळी लागते. शेवटचा श्वास घेण्याआधी शेवटचा वार नक्कीच करेल असं ती म्हणते. यामुळे पुन्हा एकदा सुश्मिता दमदार अॅक्शन अवतारात दिसणार आहे. याबद्दल सुश्मिता म्हणाली,'आर्याचं माझ्या मनात अढळ स्थान आहे आणि जसा सीझन ३ येतोय हा माझ्या आत्म्याचे दोन तुकडे एकत्र येण्यासारखा आहे. हॉटस्टारवरील आर्याचा प्रत्येक एपिसोड एक अशा जगाची यात्रा आहे जो माझ्या अस्तित्वाचा महत्वपूर्ण भाग बनला आहे. आर्या अंतिम वारमध्ये तुम्ही आर्याची अशी काही बाजू पाहाल जी आधीपेक्षा खूपच वेगळी असेल. या भूमिकेबद्दल मी जितका विचार केला होता मला त्यापेक्षाही जास्त मिळालं आहे.'

राम माधवानी आणि संदीप मोदी यांनी 'आर्या' सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. सिरीजमध्ये सुश्मितासोबतच इला अरुण, सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, विकास कुमार, गीतांजली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. ९ फेब्रुवारीला आर्याचा शेवटचा सिझन रिलीज होत आहे. 

टॅग्स :सुश्मिता सेनवेबसीरिजहिंदी