Join us  

'इंदू सरकार'ला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल; उद्याच होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 1:36 PM

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेला मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ हा सिनेमा  सुप्रीम कोर्टात पोहचला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनात येणारे अडथळे हटवत सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे.

ठळक मुद्दे सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनाला मंजूरी दिली असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 28 जुलै रोजीच सिनेमा प्रदर्शित होणार आहे.गुरूवारी या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने प्रिया पॉल यांची याचिका रद्द केली आहे.  सिनेमा कायद्याच्यादृष्टीने 'काल्पनिक अभिव्यक्ती' असून हा सिनेमा प्रदर्शन होऊ न देण्याचं कोणतंही कारण नाही.

नवी दिल्ली, दि. 27- गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेला मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ हा सिनेमा  सुप्रीम कोर्टात पोहचला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनात येणारे अडथळे हटवत सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनाला मंजूरी दिली असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 28 जुलै रोजीच सिनेमा प्रदर्शित होणार आहे. स्वत:ला संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांनी दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या सिनेमाचं प्रदर्शन थांबविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गुरूवारी या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने प्रिया पॉल यांची याचिका रद्द केली आहे. 

न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांच्या खंडपीठाने म्हंटलं, मधूर भांडारकर यांचा इंदू सरकार हा सिनेमा           1975-77च्या आणीबाणीवर आधारीत आहे. पण हा सिनेमा कायद्याच्यादृष्टीने 'काल्पनिक अभिव्यक्ती' असून हा सिनेमा प्रदर्शन होऊ न देण्याचं कोणतंही कारण नाही. तर दुसरीकडे, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेलं दृश्य सिनेमातून काढून टाकलं असून हा सिनेमा पूर्णपणे साफ आहे. कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीबरोबर याचा काहीही संबंध नसल्याचं मधूर भांडारकर यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे. इंदू सरकार हा सिनेमा कायद्याच्यादृष्टीत पूर्णपणे काल्पनिक असून सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचं कोणतंही कारण नाही, असं न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रिया पॉल यांनी मुंबई हायकोर्टात सिनेमा विरोधात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती. प्रियाने त्यांच्या याचिकेत सिनेमाचं प्रदर्शन थांबवावं, अशी मागणी केली होती. त्यांचे म्हणणं होतं की, जोपर्यंत मधुर भांडारकर सिनेमातील फॅक्चुअल पार्ट डिलीट करणार नाही, तोपर्यंत सिनेमा रिलीज केला जाऊ नये. यावर मधुर भांडारकर यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत प्रियाकडे संजय गांधी यांची मुलगी असल्याचा पुरावा मागितला होता. पण त्यांनी अद्यापपर्यंत अशाप्रकारचा पुरावा दिलेला नाही. दरम्यान गुरूवारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.