Join us  

अजय गोगावलेच्या आवाजातील ‘सुंदरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस,एकदा ऐका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 7:15 AM

या गाण्याचे शब्द पण प्रेक्षकांना आवडतील, भावतील कारण गाण्याचे बोल गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. संगीत दिग्दर्शन पण गजेंद्र अहिरे आणि त्यांच्या सोबतीला चैतन्य अडकर यांनी केले आहे.

मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट असलेला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि ट्रेलरमधून स्त्री आणि बायको यांमध्ये अडकलेल्या आईच्या आयुष्यात येणा-या अनेक घडामोडींची झलक प्रेक्षकांनी पाहिली. सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे.

तरुणी, आई आणि बायको म्हणून भूमिका साकारताना, प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देताना स्त्रीला तडजोड ही कधी ना कधी करावीच लागते. ही तडजोड कधी स्वत:च्या अस्तित्वासाठी असते तर कधी नात्यांसाठी. आयुष्य म्हटलं की नात्यांचा सहवास, त्यांचा गुंता, नात्यात होणा-या विचारांची देवाण-घेवाण या आपसूक आल्याच...पण या सर्व प्रसंगाना अगदी धैर्याने सामोरी जाते ती चित्रपटाची नायिका म्हणजेच सई ताम्हणकर.

ट्रेलरनंतर या चित्रपटाचे पहिले गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ट्रेलरमधून जशी प्रेक्षकांना चित्रपटाची झलक पाहायला मिळाली त्याचप्रमाणे या गाण्यातून देखील सईच्या भूमिकेचा अंदाज प्रेक्षकांना घेता येईल. अजय गोगावले यांचा आवाज सर्वांच्या मनावर राज्य करतो आणि त्यांच्या आवाजाची जादू ही सर्वत्र पसरली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हे गाणं प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. अजय यांनी गायलेले हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये टॉपला नक्कीच असेल याची खात्री आहे. गाण्याच्या आवाजानंतर थेट काळजाला भिडतात ते गाण्याचे शब्द... या गाण्याचे शब्द पण प्रेक्षकांना आवडतील, भावतील कारण गाण्याचे बोल गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. संगीत दिग्दर्शन पण गजेंद्र अहिरे आणि त्यांच्या सोबतीला चैतन्य अडकर यांनी केले आहे.

स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत येत्या २२ नोव्हेंबरला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरगजेंद्र अहिरे