Join us  

‘सुभेदार’ची चिंता वाढली! प्रदर्शित होताच क्लायमॅक्स सीन व्हायरल, दिग्पाल लांजेकर विनंती करत म्हणाले, “कृपया...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 5:04 PM

‘सुभेदार’ चित्रपटातील क्लायमेक्स सीनचे व्हिडिओ शूट करुन प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटातील महत्त्वाच्या सीनचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने ‘सुभेदार’च्या टीमची चिंता वाढली आहे.

बहुचर्चित ‘सुभेदार’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस प्रेक्षक वाट पाहत होते. दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकातील या पाचव्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर २५ ऑगस्टला हा ऐतिहासिक मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत होता. ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रचंड हिट झाली. तर प्रदर्शनाआधीच ‘सुभेदार’ सिनेमाची तब्बल ७ हजांराहून अधिक तिकिटे विकली गेली होती. पण, चित्रपट प्रदर्शित होताच सिनेमातील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

‘सुभेदार’ चित्रपटातील क्लायमेक्स सीनचे व्हिडिओ शूट करुन प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटातील महत्त्वाच्या सीनचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने ‘सुभेदार’च्या टीमची चिंता वाढली आहे. ‘सुभेदार’चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी याबाबत त्यांच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी क्लायमेक्स सीनचे व्हिडिओ शूट करुन ते अपलोड न करण्याची विनंती प्रेक्षकांना केली आहे.

Exclusive : 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “सिंहगडाच्या लढाईत...”

“’सुभेदार’ हे पाचवं चित्रपुष्प तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं आहे, याबद्दल आनंद आहे. आमच्या प्रयत्नांना यश मिळतंय हे पाहून आनंद होत आहे. परंतु, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील क्लायमेक्सचा भाग काही जण शूट करुन तो इन्स्टावर अपलोड करत आहेत. तुमच्या भावना मी समजू शकतो. तुम्हाला हे सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहे. पण, त्यामुळे इतरांचा रसभंग होतो. यामुळे ज्यांना सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहायचा आहे, त्यात मग मजा राहत नाही. तुम्ही घेतलेला अनुभवही त्यांना घेता येणार नाही. कृपया क्लायमेक्स किंवा चित्रपटातील इतर भाग शूट करुन अपलोड करू नका, अशी मी विनंती करतो. तुम्ही मला साथ द्याल, अशी आशा बाळगतो. माझ्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल, याची खात्री आहे. जय शिवराय,” अशी विनंती दिग्पाल लांजेकरांनी केली आहे.

Exclusive: "शाळेतला इतिहास फक्त मार्कांपुरता", चिन्मय मांडलेकरचं वक्तव्य, म्हणाला, "अनेक शिवकालीन गोष्टी......"

‘सुभेदार’ चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवता येणार आहे. सिंहगडाच्या लढाईचा थरार यातून प्रेक्षकांपुढे सादर केला गेला आहे. या चित्रपटात अजय पुरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज आणि मृणाल कुलकर्णी राजमात जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी हे कलकारही झळकले आहेत.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपटछत्रपती शिवाजी महाराज