Join us  

‘मोलकरीण बाई’चे चित्रीकरण सुरू आहे ठाण्यातील या परिसरात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 4:54 PM

‘स्टार प्रवाह’वर लोकप्रिय होत असलेल्या ‘मोलकरीण बाई’ या मालिकेसाठी कोणताही सेट उभारण्यात आलेला नाहीये. ठाण्यातल्या खऱ्याखुऱ्या वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरू आहे.

ठळक मुद्देठाण्यातल्या मणिबाग वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. या वस्तीत राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात सध्या लाईट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनचा आवाज घुमतोय. कलाकारांप्रमाणेच या वस्तीतले रहिवाशीही कलाकारांच्या भूमिकेत शिरले आहेत.

आजच्या मालिका म्हटलं की डोळे दिपवणारे सेट्स, भरजरी साड्या आणि कलाकुसरीचे दागिने हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण हाच विचार बदलवण्याचे ‘स्टार प्रवाह’ वरील ‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या टीमने ठरवले आहे.

‘स्टार प्रवाह’वर लोकप्रिय होत असलेल्या ‘मोलकरीण बाई’ या मालिकेसाठी कोणताही सेट उभारण्यात आलेला नाहीये. ठाण्यातल्या खऱ्याखुऱ्या वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी याचा विचार करता ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि मालिकेच्या संपूर्ण टीमने रिअल लोकेशनवर शूट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. ठाण्यातल्या मणिबाग वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. या वस्तीत राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात सध्या लाईट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनचा आवाज घुमतोय. कलाकारांप्रमाणेच या वस्तीतले रहिवाशीही कलाकारांच्या भूमिकेत शिरले आहेत. अत्यंत नियोजनपूर्वक या मालिकेचं शूटिंग पार पडतंय. शूटिंगचा कोणालाही त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जातेय. यासाठी मालिकेची संपूर्ण टीम मेहनत करत आहे.

या मालिकेचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर याविषयी सांगतात, ‘सेट उभा करण्यापेक्षा आम्हाला प्रत्यक्ष घटनास्थळ हवं होतं. सीनमध्ये अधिकाधिक जिवंतपणा आणण्यासाठी आम्ही खऱ्या वस्तीमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. वस्तीमधल्या लोकांसाठी शूटिंग आणि कॅमेरा या गोष्टी सुरुवातीला नव्या होत्या. पण आता त्यांना याची सवय झालीय. त्यांच्याकडूनही खूप चांगलं सहकार्य आम्हाला मिळतंय. ‘मोलकरीण बाई’ या मालिकेचा विषय हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. मोलकरीण बाई ही आपल्या आयुष्यातली अशी व्यक्ती आहे, जिच्या असण्यामुळे आपलं आयुष्य जितकं सुखकर आहे तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. आपल्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या व्यक्तीचं आयुष्य मांडण्यासाठी आम्ही रिअल लोकेशनची निवड केली अशी भावना दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी व्यक्त केली.

उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार, गायत्री सोहम अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेची असून ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळतेय.

टॅग्स :मोलकरीण बाई