Join us  

जपानमधील भूकंपातून थोडक्यात बचावले राजामौली; उंच इमारतीच्या 28 व्या मजल्यावर असताना अचानक जमीन हादरली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 11:20 AM

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली सध्या RRR सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी जपानमध्ये आहेत. जपानमध्ये त्यांना भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली सध्या RRR सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी जपानमध्ये आहेत. जपानमध्ये त्यांना भूकंपाचा धक्का जाणवला आहे. राजामौली यांचा लेक एसएस कार्तिकेयने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. सुदैवाने यातून दोघेही सुखरूप बचावले आहेत. जपानमध्ये ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के राजामौली आणि RRR च्या टीमला जाणवले. 

भूकंप झाला त्यावेळी RRR ची संपूर्ण टीम हॉटेलमधील २८व्या मजल्यावर होती. स्मार्टवॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट दाखवल्यानंतर काही वेळातच भूकंपाचे धक्के जाणवल्याचं राजामौलींच्या मुलाने म्हटलं आहे. याबाबत त्याने Xवर ट्वीट केलं आहे. स्मार्टवॉचमध्ये दाखवलेल्या भूकंपाचा अलर्ट मेसेजचा फोटो शेअर करत त्याने ट्वीट केलं आहे. यामध्ये कार्तिकेय म्हणतो, "आता जपानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. आम्ही २८व्या मजल्यावर होतो. जमीन हळू हळू हलायला लागली. हा भूकंप आहे हे जाणवायला आम्हाला थोडा वेळ लागला. मी घाबरून ओरडणारच होतो. पण, आमच्या आजूबाजूला जे जपानी लोक होते त्यांना काहीच फरक पडत नव्हता. जसं काही पाऊस पडणार आहे, अशा त्यांच्या रिअॅक्शन होत्या."

जपानच्या हवामान खात्यानेही गुरुवारी(२१ मार्च) पूर्व भागात ५.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती दिली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये २१ भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्यापैकी एकाची तीव्रता ही ७.६ रिश्टर स्केल होती. 

दरम्यान, राजामौली गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत. कुटुंबीय आणि टीमसह RRRच्या स्क्रिनिंगसाठी सहभागी होण्यासाठी ते जपानला गेले होते. जपानमध्ये राजामौलींचा RRR सिनेमा गेल्या ५१३ दिवसांपासून थिएटरमध्ये आहे. जपानमध्ये RRRची प्रचंड क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :एस.एस. राजमौलीजपानभूकंपआरआरआर सिनेमा