Join us  

प्रभू श्रीरामाचा अपमान आणि FIR नंतर नेटफ्लिक्सचा मोठा निर्णय! नयनताराचा 'अन्नपूर्णी' सिनेमा ओटीटीवरुन गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 3:21 PM

नयनताराचा 'अन्नपूर्णी' नेटफ्लिक्सवरुन हटवला! प्रभू श्रीरामाला मांसाहारी म्हटल्याने दाखल केलेला FIR

अयोध्येत श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची सर्वत्र धामधूम सुरू असताना नयनताराच्या 'अन्नपूर्णी' सिनेमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमातून  लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्याबरोबरच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी 'अन्नपूर्णी' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली होती. 

'अन्नपूर्णी' सिनेमातील काही क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या सिनेमातील अभिनेता नयनताराला "प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी वनवासात असताना प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खाल्लं होतं. ते मांसाहारी होते , असं वाल्मिकी रामायणात म्हटलं आहे", असं म्हणतो.सिनेमातील या संवादामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. १ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झालेला 'अन्नपूर्णी' चित्रपट ३१ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे वादानंतर नेटफ्लिक्सवरुन हा चित्रपट हटवण्याची मागणी होत होती. त्याचबरोबरच ट्वीटरवर #boycottnetflix हा हॅशटॅगही ट्रेंड करण्यात आला होता. 

चित्रपटातील संवादामुळे सुरू झालेला वाद आणि सिनेमाला होणारा विरोध पाहून नेटफ्लिक्सवरुन नयनताराचा 'अन्नपूर्णी' हटविण्यात आला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन 'अन्नपूर्णी' सिनेमा डिलीट करण्यात आला आहे. त्यामुळे आता नेटफ्लिक्सवर हा सिनेमा उपलब्ध नाही. नयनतारा, जय, कार्तिक कुमार अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन निलेश कृष्णा यांनी केलं आहे.  

टॅग्स :नयनताराराम मंदिर