Join us  

'जय मल्हार' फेम मराठी अभिनेत्याची साऊथमध्ये एन्ट्री, सिनेमाच्या टीझरमध्ये दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 5:18 PM

मराठी अभिनेता दाक्षिणात्य चित्रपटात साकारणार खलनायक, टिझरमध्ये दिसली झलक

पिळदार शरीरयष्टी आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. 'जय मल्हार' मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेतील खंडोबाच्या भूमिकेने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. यानंतरही देवदत्त अनेक मालिका आणि चित्रपटांत दिसला होता.  देवदत्त नागेने चित्रपटांतही विविधांगी भूमिका साकारल्या. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही देवदत्तने अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं. आता देवदत्तने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली आहे. 

'देवकी नंदन वासुदेवा' या सिनेमातून देवदत्तने तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमात तो खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील फर्स्ट लूक देवदत्तने शेअर केला होता. आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये देवदत्तच्या भूमिकेची झलक पाहायला मिळत आहे. देवदत्त या सिनेमात कामसाराजू हे पात्र साकारताना दिसणार आहे. देवदत्तच्या या सिनेमाचा टीझर अॅक्शनने भरपूर आहे. 

टीझरमध्ये देवदत्तची झलक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्याची भेदक नजर आणि करारी बाणा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. केस आणि वाढलेल्या दाढीमध्ये देवदत्त अगदी राऊडी दाक्षिणात्य हिरोसारखा दिसत आहे. अर्जुन जे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :देवदत्त नागेTollywoodमराठी अभिनेता